मालेगावी उत्कंठा शिगेला
By admin | Published: May 26, 2017 12:16 AM2017-05-26T00:16:36+5:302017-05-26T00:17:47+5:30
मालेगाव : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार यांसारख्या प्रश्नांंची उत्तरे मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणाचे भाग्य उजळणार... यांसारख्या प्रश्नांंची उत्तरे शुक्रवारी (दि. २६) मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत. त्यामुळे मतमोजणीबाबत उमेदवारांसह सर्वांचीच उत्कंठा वाढली असून, मातब्बरांच्या निकालांकडे लक्ष लागून राहिले आहे.महापालिकेच्या ८३ जागांसाठी किरकोळ हाणामारीजा प्रकार वगळता बुधवारी शांततेत व उत्साहात मतदानप्रक्रिया पार पडली. ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. मतदानाची टक्केवारी ५९.५२ नोंदली गेली. उन्हाच्या काहिलीमुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत सुमारे चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे निकालाबाबत राजकीय तज्ज्ञही संभ्रमित आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, एमआयएम, बसपा, सपा यांसह छोट्या राजकीय पक्षांनी निवडणुकीत आपली सारी ताकद पणाला लावत चुरस निर्माण केली. स्थानिक नेत्यांनी चौका-चौकांत प्रचारसभा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आता प्रचारातही आघाडी घेण्यावरून मोठी चुरस निर्माण झाली होती.