मालेगावी शेतकऱ्याची न्यायासाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:50 PM2021-11-28T22:50:56+5:302021-11-28T22:50:56+5:30
मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.
मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.
भाऊसाहेब निकम यांनी २५ एप्रिल रोजी झोडगे मार्केटला २७ क्विंटल २० किलो कांदा माल ७५० रुपये भावाने परवानाधारक कांदा व्यापारी किरण वसंतराव पारखे (चांदवड) यांना विकला. आडत, हमाली काढून २० हजार ९१ रुपये एवढे बिल झाले. शेतमाल १० मे रोजी घेताना तसे पावतीवरदेखील लिहून दिले. निकम यांनी विश्वास ठेवत मान्य केले, मात्र त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. तेव्हापासून ते हक्काच्या पैशासाठी या व्यापाऱ्याला सारखा फोन करीत आहेत, मात्र सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत असून, कधी फोन बंद, कधी उचलतच नाही त्यामुळे शेतकरी कंटाळला आहे.
मालेगाव मार्केट कमिटीत अर्जफाटे करून झालेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासमोरही फोनद्वारे समस्या मांडली, त्यांनीही व्यापाऱ्याला शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी तंबी दिली, मात्र तीही लागू झाली नाही. निकम हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यासाठी वीस हजार ही खूप मोठी रक्कम आहे. व्यापाऱ्याने दिवाळीत फोनपेद्वारे फक्त पाच हजार दिले.
हे चुकते शेतकऱ्यांचे
शेतकरी वेळोवेळी व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे काढण्यासाठी मार्केट कमिटीकडे अर्जफाटे करतात, मात्र पोच घेत नाहीत. त्यामुळे कोणी त्यांना बोलू देत नाहीत. शिवाय युनियन नसल्याने शेतकरी एकजूट नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.