मालेगाव : भर उन्हात महिलांची पायपीट अजंग परिसरात पाणीटंचाईने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:12 AM2018-04-06T00:12:08+5:302018-04-06T00:12:08+5:30
अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. संबंधितांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. अजंग परिसरात शासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याअभावी परिसरातील नागरिकांना स्थलांतराची भीती निर्माण झाली आहे. शासनाने शेती महामंडळाची जमीन मोठमोठ्या कंपनीधारक व बांधकाम व्यावसायिकांना दिल्याने त्यांनी सहा इंची शेकडो कूपनलिका केल्या. सदर कूपनलिका रावळगाव शिवारापासून ते मालेगाव दूध डेअरीपर्यंत केल्या. त्याही एका एकरमध्ये सुमारे दोन ते चार कूपनलिका करून त्या सहा इंची रुंद व एक हजार ते पंधराशे फूट खोल केल्याने पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी तसेच कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणीपुरवठा विभागाच्या विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली
आहे. शेकडो कूपनलिका केल्याने त्याची झळ थेट मालेगाव दूध डेअरी तसेच भायगाव नववसाहत आदर्शनगरपर्यंत बसली आहे. सदर लोकांनी एक हजार फुटापर्यंत खोल कूपनलिका करताना शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. शासनाच्याच जमिनीवर बेकायदेशीर हजार फूट खोलीच्या कूपनलिका केल्याने त्याची झळ बसली आहे. शासनाने नागरिकांना पाणीसंकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच बेकायदेशीररित्या महामंडळाच्या जमिनीवर खोदलेल्या कूपनलिकाधारकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.