मालेगावी जंगल झाले विरळ
By admin | Published: August 14, 2014 10:26 PM2014-08-14T22:26:13+5:302014-08-15T00:37:16+5:30
मालेगावी जंगल झाले विरळ
मालेगाव : शहरातील म्हाळदे, सवंदगाव, द्याने, दरेगाव, आझादनगर, बापू गांधीनगर, इस्लामपुरा, मोसम नदीकाठ, कॅम्प आदि भागांत किरकोळ लाकूडविक्री केंद्रे - वखारी अवैधरीत्या बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अगदी अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी घनदाट असणारे तालुक्यातील जंगल आता अतिविरळ होत चालले आहे. या सर्व प्रकारास वन, महसूल व पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत.
शहरात चाळीसगाव - कन्नडमार्गे रोज साधारण १० ते १५ अवैधरीत्या लाकूड वाहतूक करणारे ट्रक दाखल होत असतात. मालेगाव तालुका व धुळे तालुका भागातून, महाराष्ट्र - गुजरात सीमावर्ती भाग, बागलाण तालुका येथून ही मोठ्या प्रमाणात शहरात लाकूड आणले जाते. यापैकी काही ट्रक लाकूड हे नियमितपणे बंगलोर येथील फर्निचर कारखान्यात पाठविले जातात. याकडे मात्र वनविभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनास त्याची सुतराम कल्पना नाही यावर कोण विश्वास ठेवणार? गेल्या दहा वर्षांत वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात किती कारवाया केल्या? किती जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले? याची आकडेवारी सर्वसामान्य जनतेसमोर यायला हवी. वनविभागाचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहिमेला हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण व वन्यजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. या वाढत्या जंगलतोडीमुळेच बिबट्यासह इतर जंगली प्राण्यांचे नागरी वस्तीत घुसणे व जीवितहानी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मालेगाव शहर - तालुक्यात अवैध वृक्षतोड व लाकडाची चोरटी वाहतूक होत नसल्याचा दावा करणाऱ्या वन - महसूल व पोलीस प्रशासनाने फक्त शहरात येणारे व वापरले जाणारे लाकूड येते कोठून याचा खुलासा करून पर्यावरण ऱ्हासास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.