मालेगाव ‘खैर’ जंगलतोडीचा तपास करणारे दक्षता पथक भरकटले; झाडांच्या कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच जास्त ‘दक्षता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 04:29 PM2017-10-15T16:29:41+5:302017-10-15T16:31:12+5:30
नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागू शकला नाही. एकूणच वृक्षांच्या झालेल्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
http://www.lokmat.com/nashik/well-done-vigilance-squad/
मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी संबंधित खैर वृक्षांच्या कत्तल करणाºया टोळीचा या जंगलात धुमाकूळ वाढला आहे. टोळीने उसाच्या शेतामधील ऊस कापावा असा या जंगलातील खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास-शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैराची झाडे कापून गुजरातमधील गुटख्याच्या कारखान्यांना पुरविल्याची चर्चा आहे. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून मागील गुरूवारपासून (दि.११) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे, अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यास अद्याप पथकाला यश आलेले नाही. एकूणच पथकाचा तपास भरकटल्याचे बोलले जात आहे. कारण पथकाने अद्याप एकाही संशयिताला या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही.
‘दक्षता’चे अपयश
मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीत झालेल्या खैरच्या जंगलतोडीचा शोध लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नाशिकच्या ‘दक्षता पथक’ अपयशी ठरले आहे. केवळ पंचनामा करुन कागदी घोडे नाचविण्याचे सोपस्कार या पथकाकडून पार पाडण्यात आले; मात्र अद्याप मुळ तस्कर टोळीमधील किंवा एकालाही अटक करण्यास पथकाला यश आले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.