मालेगाव : कुलजमात तन्जीम संघटनेची मागणी बॉम्बस्फोट निकाल प्रकरणाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:11 AM2018-04-18T00:11:04+5:302018-04-18T00:11:04+5:30
आझादनगर : बॉम्बस्फोटातील संशयितांची झालेली सुटका, त्यानंतर न्यायाधीशांनी दिलेला राजीनामाळे सरकारने या निकालाविरोधात अपिल करावे, अशी मागणी केली आहे.
आझादनगर : हैदराबाद येथील मक्का मशीद बॉम्बस्फोटातील सर्व संशयितांची पुराव्याअभावी झालेली सुटका, त्यानंतर विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला राजीनामा या घटनाक्रमामुळे मालेगाव कुलजमात तन्जीमने सखेद आश्चर्य व्यक्त करीत याची सखोल चौकशी करीत आंध्र प्रदेश सरकारने या निकालाविरोधात अपिल करावे, अशी मागणी केली आहे. आलेल्या निकालामुळे अस्वस्थ होत कुलजमात तन्जीमची मंगळवारी सकाळी ११ वाजता बडा कब्रस्तान येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान मौलाना अब्दुल हमीद अझहरी यांनी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. देशातील सर्वच बॉम्बस्फोट प्रकरणांत संशयितांना मोकळीक दिली जात आहे, तसेच वकिलांवर दबाव आणला जात आहे. सुन्नी जमातचे मौलाना सुफी गुलाम रसूल यांनी या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले. अजमेर, मक्का मशीद, मालेगाव येथील बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा कबुलीजबाब असिमानंदने दिला होता. तरीही मृतांना न्याय मिळत नसेल तर या विरोधात अस्वस्थतेची भावना निर्माण होणे साहजिक आहे. निकाल दिल्यानंतर न्यायाधीशांनी राजीनामा देणे यामुळे या खटल्याप्रती संशय व्यक्त होत असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी जमात अहेले हदीसचे मौलाना शकील फैजी, जमात-ए-इस्लामीचे मौलाना फिरोज आझमी, मौलाना अब्दूल बारी, हाजी हनिफ साबीर, अकबर शेख आदी उपस्थित होते. दि. १८ मे २००७ रोजी जुमाच्या नमाजवेळी मक्का मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये नऊ जण ठार तर ५८ जण जखमी झाले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी स्वामी असिमानंद यांनी याबाबत न्यायालयात कबुलीजबाब दिला होता. हा खटला एनआयएच्या विशेष न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सोमवारी संशयित सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.