मालेगावी यंत्रमाग कारखानदारांचा सात दिवस बंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:49 PM2018-10-27T17:49:38+5:302018-10-27T17:49:54+5:30
मालेगाव :यंत्रमाग व्यवसायावरील मंदीचे सावट व दिवाळी सण काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान सात दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील यंत्रमाग उद्योजकांनी घेतला आहे.
मालेगाव :यंत्रमाग व्यवसायावरील मंदीचे सावट व दिवाळी सण काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान सात दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील यंत्रमाग उद्योजकांनी घेतला आहे. तर २६ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्टÑभर यंत्रमाग बंद ठेवून नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मोर्चा काढण्यात येणार आहे.
येथील अन्सार जमातखाना हॉलमध्ये यंत्रमाग संघटना, राजकीय पदाधिकारी तसेच मुस्लिम धर्मगुरूंच्या उपस्थितीत यंत्रमाग कारखानदारांची बैठक झाली. या बैठकीत सात दिवसांच्या बंदची हाक देण्यात आली आहे. यंत्रमाग व्यवसाय अनेक संकटांचा सामना करत आहे. शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने हा व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. दिवाळी सणामुळे यंत्रमाग व्यवसायाची उलाढाल ठप्प असते. त्यामुळे ६ ते १२ नोव्हेंबरपर्यंत कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे हे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या असलेल्या सुताची सट्टेबाजी केली जाते. टेक्सटाईलकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. वीज दरात दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. वेगवेगळ्या करांमुळे भारतातील उत्पादित कापड अन्य देशाच्या तुलनेत महाग झाले आहे. परिणामी इतर देशांच्या कापडाला मागणी वाढली आहे. सरकारने यंत्रमाग व्यावसायिकांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे यासाठी २६ नोव्हेंबरला महाराष्टÑात यंत्रमाग बंद ठेवून नागपूरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आमदार आसीफ शेख, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, युसुफ इलियास, मौलाना अब्दूल बारी, मौलाना हमीद अझहरी, शब्बीर डेगवाले, इकबाल अमरवीर, साजिद अन्सारी, मोईन खालीद यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस विविध १३ यंत्रमाग कारखानदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.