मालेगाव महापौरांची राजीनाम्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:27 PM2017-09-11T23:27:07+5:302017-09-12T00:11:03+5:30
दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागे मालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदे यासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने शेख यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे महापौरांचा राजीनामा हे चहाच्या कपातील वादळ ठरले.
दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागे
मालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदे
यासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने शेख यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे महापौरांचा राजीनामा हे चहाच्या कपातील वादळ ठरले.
महापौरपद स्वीकारून तीन महिने उलटले मात्र कामे होत नसल्यामुळे रशीद शेख संतप्त झाले. सोमवारी त्यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. अंदाजपत्रकाला मंजुरी, विविध फाईलींना मंजुरी देण्यास होणारा विलंब, उपायुक्तांची रिक्त पदे, १३ कोटींचा रखडलेला शहरविकासाचा आराखडा, रस्ते, गटारी, संकीर्ण करांचा ठेका, अतिक्रमण, उत्पन्नवाढीचे स्त्रोत यासह इतर प्रश्न मार्गी लागत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर कॉँग्रेस नगरसेवकांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना महापौर शेख यांचा राजीनाम्याचा निर्णय कळताच त्यांनी तातडीने संपर्क साधून महापालिकेतील रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली जाईल तसेच इतर कामांबाबत आयुक्त व प्रशासनाची बैठक घेऊन तोडगा काढू, राजीनामा देऊ नका असे सांगितले. राज्यमंत्र्यांच्या आश्वासन महापौरांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.