मालेगावचा पारा ४३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:15 AM2018-04-26T00:15:09+5:302018-04-26T00:15:09+5:30
शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते.
मालेगाव : शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या तपमानाने चाळिशी पार केली आहे. दररोज तपमानात वाढ होत असल्याने नागरिक उन्हाच्या तीव्रतेमुळे हैराण झाले आहेत. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. भरउन्हात आप्तेष्ट नातेवाइकांची लग्नांना हजेरी लावण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे. दुपारच्या सत्रात कडक ऊन असल्यामुळे नागरिक उपरणे, टोपी, गॉगल आदींचा आधार घेत उन्हापासून बचाव करीत आहेत. उन्हामुळे विकारांमध्येही वाढ झाली आहे. आबालवृद्धांना उन्हाचा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाढत्या उन्हामुळे मजूर कामाला येण्यास नकार देत आहेत. शेत शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांचा व पिकांचा पिण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. बहुतांशी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तर बारा गाव योजना, २६ गाव योजना, माळमाथा पाणीपुरवठा आदी योजनांद्वारे आठ-आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. माळमाथा व काटवन भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक दिसून येत आहे. तालुक्यातील सातही लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत अशीच वाढ होत राहिली तर जनजीवनावर विपरित परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.
बर्फापासून व्हा सावध !
उन्हाच्या तीव्रतेने जिवाची काहिली होत असल्यामुळे मालेगावकर दिलासा मिळवण्यासाठी शीतपेय व बर्फाचा वापर असलेले पदार्थ सेवन करताना दिसून येत आहेत; मात्र बर्फामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बर्फाची शुद्धता व दर्जाबाबत साशंकता आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहावे यासाठी भरपूर पाणी प्यावे; मात्र उन्हातून आल्यास तत्काळ फ्रीज किंवा माठामधील पाणी पिणे टाळावे. काही वेळ शांत बसल्यानंतर हळूहळू पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच जास्त वेळ घराबाहेर उन्हात राहणाऱ्या लोकांनी उसाचा रस किंवा अन्य प्रकारच्या
फ ळांचा रस पिणे टाळावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.