मालेगावचा पारा ४४.८ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:56 AM2018-04-28T01:56:25+5:302018-04-28T01:56:25+5:30
मालेगाव : शहर परिसरात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. शुक्रवारी (दि. २७) मालेगावचे तपमान ४४.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तपमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मालेगावच्या तपमानाने उच्चांकी सरासरी गाठली आहे. गुरुवारी ४३ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला होता. शुक्रवारी मात्र पाऱ्याने ४४.८ अंश सेल्सिअसवर उडी घेतली. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके जाणवू लागले होते. दुपारच्या सत्रात सूर्य आग ओकत होता. लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने नागरिकांनी भरउन्हात लग्नांना हजेरी लावली तर उन्हाच्या प्रकोपामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. उन्हाची दाहकता सर्वांनाच जाणवत आहे. जनावरे व पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत कमालीचा उकाडा जाणवत होता.