मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:52 AM2019-07-17T01:52:24+5:302019-07-17T01:52:46+5:30
वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले.
मालेगाव : वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले.
वैयक्तिक शौचालय अनुदान घेऊनही शौचालयांची कामे पूर्ण न करणारे पाच हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. काहींनी अनुदान घेऊनही अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. याबाबत कुचराई केल्याचा फटका पाच लिपिकांना बसला. निलंबित केलेल्या पाच लिपिकांमध्ये प्रभाग १ चे नीलेश देवरे, विनोद बहुतकर, प्रभाग २ चे कुणाल कुलकर्णी, प्रभाग ४ चे शाहीद अख्तर व बापू शिरसाठ या पाच जणांचा समावेश आहे. संबंधित तीनही प्रभागातील निलंबित केलेल्या पाच जणांनी वैयक्तिक शौचालयांची कामे लाभार्थींकडून करून घेतली नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाभार्थींच्या शौचालयाचे छायाचित्रही जी. एम. पोर्टलवर अपलोड केले नाही. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले. कामात कुचराई व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपकादेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.