मालेगावी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:05+5:302021-09-23T04:16:05+5:30
माजी आमदार शेख यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन महापालिकेच्या निवडणुकीत शहराच्या पूर्व व पश्चिम भागात उमेदवार ...
माजी आमदार शेख यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन महापालिकेच्या निवडणुकीत शहराच्या पूर्व व पश्चिम भागात उमेदवार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परिणामी एमआयएम, जनता दल, काँग्रेस, भाजप, शिवसेनेपुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठे तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केले होते. त्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ नगरसेवक निवडून आले होते. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी एमआयएममध्ये प्रवेश केला. परिणामी शहराच्या पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन खिळखिळे झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अतिक कमाल, युसुफ नॅशनलवाले यांनी सांभाळली तर पश्चिम भागात राजेंद्र भाेसले, अनंत भोसले, दिनेश ठाकरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन केले. गेल्या ६ महिन्यांपूर्वी माजी आमदार आसीफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षात उभारी आली आहे. पूर्व व पश्चिम भागात संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे. शेख यांनी युवा मेळावा व तीन सभा घेतल्या. तसेच पक्ष संघटन वाढविण्यासाठी महिला आघाडीसह विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. येथील राष्ट्रवादी भवन सुरू करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत.
इन्फो
सरळ सामना होण्याची शक्यता
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएममध्ये सरळ सामना होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील पूर्व व पश्चिम भागातील वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम भागात शिवसेना व भाजपपुढे तर पूर्व भागात एमआयएम, जनता दल, काँग्रेसपुढे राष्ट्रवादी काँग्रेस तगडे आव्हान उभे करून जनतेला पर्याय म्हणून समोर येणार आहे.