दुसऱ्या लाटेतही मालेगाव पॅटर्न चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 10:51 PM2021-05-18T22:51:40+5:302021-05-19T00:57:10+5:30
नाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव दुसऱ्या लाटेत नियंत्रणात आहे. नागरिकांची वाढलेली प्रतिकारशक्ती, मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टर व अत्यल्प खर्चात होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे तसेच कोरोनाच्या भीतीला दूर सारीत मालेगावातील पूर्व भागातील नागरिकांनी कोरोनावर धाडसाने मात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाण घसरल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस व महापालिकेच्या सततच्या कारवाया व नागरिकांनी दाखविलेला संयम व सहकार्यामुळे मालेगावी कोरोना नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे.
अतुल शेवाळे

गेल्या दोन आठवड्यांपासून मालेगाव शहरातील आठ व ग्रामीणचे दोन अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून ५० पेक्षा कमी आढळून आली आहे. पूर्व भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवताच मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टरांकडून तातडीने उपचार केले जात आहेत.
पूर्व भागातील डॉक्टरही कोरोनाबाधित रुग्णांशी बिनधास्तपणे संवाद साधून वेळीच औषधोपचार करत आहेत. मालेगावच्या नाइट लाइफमुळे रुग्णालये २४ तास खुली असतात. शहरातील नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. गेल्यावर्षी मालेगाव पॅटर्न चर्चेला आला होता. यंदा कोरोनाची लाट भयावह असतानादेखील नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यात मालेगावची रुग्णसंख्या कमी आहे.
येथील बडा कब्रस्थानात १ मे ते १६ मे दरम्यान १३८ दफनविधीची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी मे महिन्यात ३४१ दफनविधी झाले होते. १३८ पैकी केवळ ८ ते १० मृत्यू कोरोनाबाधितांचे आहे. अन्य मृत्यू नैसर्गिक व इतर कारणांमुळे झाल्याचे नोंदींवरून दिसून येत आहे. आयेशानगर कब्रस्तानात १ ते १५ मे दरम्यान ३८ दफनविधी झाले आहेत. यात फक्त एक कोरोनाबाधित व अन्य आजाराने व नैसर्गिक कारणांमुळे ८ लहान मुले व २९ ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.
नियंत्रणाची ही आहेत कारणे...
रमजान पर्वानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पौष्टिक व सकस आहाराचे सेवन, यंत्रमाग कामगारांची मेहनत, पुरेसा आराम या गोष्टी कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावी पोषक ठरत आहेत. शहरातील डॉक्टरांकडूनही कोरोनाची भीती नाहीशी करून रुग्णांच्या जवळ जात मानसिक आधार देऊन रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. परिणामी भीतीचा आजार असणारा कोरोना मालेगावात नियंत्रणात आहे. १ मे रोजी एकूण ५१४ रुग्ण आढळून आले होते, तर १७ मे रोजी ११९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.