मालेगावी प्लाझ्मा थेरपीने शेकडोंना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:33+5:302021-04-21T04:14:33+5:30
कोरोना काळात मोट्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींसह इतर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. ...
कोरोना काळात मोट्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींसह इतर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. लोकांनी रक्तदान करून प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. दिलीप भावसार यांनी केले आहे.
प्लाझ्मा म्हणजे काय ?
माणसाच्या शरीरातील रक्ताचे साधारण दोन घटक असतात. रक्तपेशी व द्रव पदार्थ ( प्लाझ्मा). पेशी मध्ये लाल व पांढऱ्या पेशी तसेच रक्तपिटिका येतात. रक्तात निम्म्यापेक्षा जास्त द्रव पदार्थ असतो, त्यात प्रोटीन, प्रतिजैविके व इतर पोषक पदार्थ असतात.
कोविड प्लाझ्मा म्हणजे काय ?
जेव्हा व्यक्तीला एखाद्या आजाराचे संक्रमण होते म्हणजे त्या आजाराचे जंतु शरीरात जातात तेव्हा त्या जंतुच्या विरोधात शरीरात प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके ( एंटीबॉडी) त्या जंतुंना अटकाव करतात व नष्ट करतात. ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात अशी प्रतिजैविके तयार होऊ शकतात. अशा प्लाझ्माला कोविड प्लाझ्मा म्हणतात. शहरात अशा कोविड प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्ती पुढे आल्यास आणखी अनेकांना जीवनदान मिळू शकते.
प्लाझ्मा दान कसे करतात?
- एका विशिष्ट प्रकारच्या मशीनद्वारे प्लाझ्मा घेतला जातो. यात दात्याच्या शरीरातील रक्त मशीनमध्ये जाऊन त्यातील फक्त प्लाझ्मा वेगळा केला जातो व बाकीचे रक्तघटक शरीरात परत केले जातात. या प्लाझ्मा दानाने दात्याला काही त्रास होत नाही, हे पूर्णपणे सुरक्षित आहे. १८ ते ६ वयोगटातील व्यक्ती ज्याचे वजन ५० किलोच्या पुढे आहे. रक्तदानाच्या इतर अटी पूर्ण करणारे तसेच ज्यांना कोविड होऊन गेला आहे पूर्ण बरा होऊन २८ दिवस झाले आहेत, असे प्लाझ्मा दान करू शकतात. दर १५ दिवसांनी असे प्लाझ्मा दान करू शकतात.
कोट,,,
कोविड प्लाझ्मामध्ये असलेली प्रतिजैविके रुग्णाच्या शरीरातील विषाणूंना नष्ट करू शकतात. त्यामुळे आजाराचे प्रमाण कमी होऊ शकते. कोविडचे निदान होऊन जेवढ्या लवकर प्लाझ्मा दिला जाईल, तेवढा जास्त उपयोग होतो, असा अभ्यासाचा अनुभव आहे.
- डॉ. दिलीप भावसार,
मालेगाव.
इन्फो
रक्तदान शिबिरांची आवश्यकता
गैरसमज किंवा पूर्ण माहिती नसणे यामुळे अजूनही प्लाझ्मा दाते पुढे येत नाहीत. आज प्लाझ्माची
मागणी जास्त प्रमाणात असून, प्लाझ्मा दाते कमी आहेत. कोविड पूर्ण बरा होऊन तसेच कोरोना लस घेतल्याच्या २८ दिवसानंतर प्लाझ्मा दान करता येऊ शकते. आज कोरोनाचे थैमान असले तरी इतर अनेक आजारी लोकांना रक्ताची गरज असते; परंतु रक्तच उपलब्ध होत नसल्याने अशा रुग्णांचे हाल होत आहेत. काही संस्था, राजकीय पक्ष व समाज कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे थोडे फार रक्तदान होत आहे; मात्र रक्त ४२ दिवस टिकत असल्याने दर १५ दिवसांनी रक्तदान शिबिरे घेणे महत्त्वाचे बनले आहे.