अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले मालेगाव : पोलीस प्रशासनाची क्रॅक डाउन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:50 AM2018-02-09T00:50:29+5:302018-02-09T00:51:25+5:30
मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.
मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, साडेतीन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना नोटिसा बजावून लेखी स्वरूपात खुलासा मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची छुप्या पद्धतीने माहिती संकलित करण्यात आली असून, पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथकाद्वारे छापे टाकले जात आहेत. या मोहिमेंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. जिल्हाभरातून ४७ फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध मद्य विक्री, बेकायदा मद्य वाहतूक, हातभट्टी, गावठी दारू तयार करणे, अंक आकडे, पत्त्यांवर जुगार खेळणे आदी धंद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत.
दारूबंदी कायद्यान्वये ५७, तर जुगाराचे १२ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टी तसेच अवैध मद्याचा सुमारे तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल, तर जुगाराचे एक लाख आठ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी ९१६८५५११०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फेसबुक पेज व ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यासह ०२५३-२३०९७१५ या क्रमांकावरही संपर्क साधून नागरिकांना माहिती देता येणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अवैध धंदेवाल्यांचे व सराईत गुन्हेगारांचे, झोपडपट्टी दादांचे धाबे दणाणले आहे.