मालेगाव :रजा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:21 AM2021-11-17T01:21:54+5:302021-11-17T01:22:14+5:30
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी बंदचे आवाहन केलेल्या रजा अकॅडमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर मंगळवारी दि(१६) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत तर रजा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.
मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी बंदचे आवाहन केलेल्या रजा अकॅडमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर मंगळवारी दि(१६) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत तर रजा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मालेगाव शहरात दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या .पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत अटक सत्र राबवत ४२ जणांना अटक केली आहे. त्यात माजी नगरसेवकासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दगडफेकीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील लल्ले चौकातील रजा अकॅडमीच्या कार्यालयावर मंगळवारी मध्यरात्री शहर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी छापा टाकून झाडाझडती घेतली कार्यालयातून बंद संदर्भातील पत्रके व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यातील हिंसाचाराच्या घटनेनंतर केवळ मालेगावच्या कार्यालयावर पोलिसांनी झडती सत्र राबविले आहे, अटक सत्र दरम्यान रजा अकॅडमीचे इम्रान रिजवी यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या रडारवर आता बंदचे आयोजन करणाऱ्या ऑल इंडिया जमियातुल उलमा व रजा अकॅडमी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत दगडफेकीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी .शेखर,जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील मालेगावी तळ ठोकून आहेत तर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक सत्र राबविण्यात येत आहे.