मालेगावी निर्बंधामुळे व्यावसायिक हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:09+5:302021-04-12T04:13:09+5:30
मालेगाव कॅम्प : देशभरात कोरोनाने कहर केला आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशभरासह कोरोना आपल्या उंबरठ्यावर पोहाेचला ...
मालेगाव कॅम्प : देशभरात कोरोनाने कहर केला आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशभरासह कोरोना आपल्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. यामुळे आरोग्याच्या प्रश्नांसह आर्थिक घडी पूर्ण विस्कटली जात आहे. मालेगाव शहरात संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर थोड्या-अधिक निर्बंधांमुळे लहान-मोठे व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता घरातील मंडळींना सतावत आहे.
शहरात पूर्व, पश्चिम भागात नवीन नियमावलीनुसार अंमलबजावणी सुरू आहे. सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार व शनिवार, रविवार हे दोन दिवस असे वेगवेगळ्या नियमांनुसार निर्बंध, संचारबंदी, कलम १४४ नुसार शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील अनेक व्यक्ती बाधित होत आहेत. खासगी व सरकारी रुग्णालये, कोविड केंद्र गर्दीने फुलली आहेत. याचा परिणाम लहान-मोठ्या उद्योग-धंद्यांवर होत आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर जनरल दुकाने, सलून, कुशन, पुस्तक दुकाने, पान, चहा टपरीसह इतर विविध व्यवसायांची प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे व्यवसाय आर्थिक डबघाईस आला आहे. या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांच्या घरची परिस्थिती बेताची झाली आहे. घरातील महिलांना खर्च करताना आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. यात गेल्या वर्षी सलून सात-आठ महिने बंद झाले होते. त्यावर आता पुन्हा निर्बंध आले. त्यामुळे घरातील दागदागिने विकण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोट :
माझ्या पतीचे कार डेकोरचे दुकान आहे. अगोदरच व्यावसायिक स्पर्धा सुरू आहे. त्यात वर्षभरात कोरोनामुळे दुकान बंद व सुरू आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. अनेक वेळा दुकान बंद दिसल्यास ग्राहक तुटतात व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ब्रेक द चेन नियमापेक्षा काही ठोस निर्णय घ्यावा अथवा शासनाने मदत करावी.
- सोनल सोनवणे, गृहिणी, मालेगाव
माझ्या पतीचा बांधकामविषयी व्यवसाय आहे. शासनाचे निर्बंध, त्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे व्यवसाय बंद आहे. वाहन अडगळीत लावले आहे. कडक निर्बंधांचा कंटाळा आला आहे. व्यवसाय वर्ष - दीड वर्षापासून बंद आहे. चरितार्थ कसा चालवावा याची चिंता, मुलांचे शिक्षण, पालन पोषण आदींमुळे त्रस्त झाले आहे. यातून लवकर मार्ग निघायला हवा.
- मीनाबाई चौधरी, गृहिणी, कलेक्टरपट्टा
शहरात वर्षभरात निर्बंधामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. माझ्या पतीच्या सलून व्यवसायास घरघर लागली आहे. मागील वर्षी सात-आठ महिने सलून बंद होते. आर्थिक चिंतेने आम्हास ग्रासले होते. इतर व्यवसाय सुरू होते, पण सलून बंदच होते. प्रसंगी घरातील मौल्यवान वस्तू अनेक बांधवांनी गहाण ठेवून, विक्री करून घर चालवले होते. यावर शासनाने आर्थिक मदत, सवलत द्यावी जेणेकरून जीवन जगणे सुकर होईल.
- शीतल अहिरे, गृहिणी, मालेगाव