आनंदाच्या शिधासोबत देणार मालेगावची साडी - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:25 PM2024-02-10T18:25:20+5:302024-02-10T18:27:30+5:30
मालेगावी यंत्रमागधारकांची बैठक.
चंद्रकांत सोनार, मालेगाव (नाशिक) : शहरातील यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आगामी काळात मालेगावच्या यंत्रमागावर तयार होणाऱ्या साड्या शासनाकडून खरेदी करून आनंदाचा शिधासोबत दारिद्र्यरेषेखालील महिलांना देण्याचा मानस आहे. त्याद्वारे मालेगावच्या वस्त्रोद्योगाला चालना मिळून नागरिकांच्या हक्काचा रोजगार मिळू शकेल, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील डायमंड हॉलमध्ये शहरातील यंत्रमागधारकांची बैठक घेण्यात आली. त्यात यंत्रमागधारकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, सुमित पवार, काकाजी पवार आदींसह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात शेती व कापड निर्मिती या व्यवसायातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी अशा ठिकाणी यंत्रमागधारकांची संख्या अधिक आहे. देशातील पारंपरिक उद्योगाला आगामी काळात चालना मिळावी, यासाठी वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल सरकारतर्फे माफक दरात व्यावसायिकांना पुरविला जाणार आहे. त्यातून निर्माण होणारे कापड सरकारकडून खरेदी केले जाणार आहे. यासाठी यंत्रमागासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याबाबतही शासन विचाराधिन असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावे
ओबीसीला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. यासाठी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना आश्वासन दिले आहे. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परंतु तरीही जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरही उपाेषणाची गरज काय, असा सवालही शेवटी त्यांनी केला.
नितेश राणेंना देणार सल्ला
मालेगाव शहराला वारंवार मिनी पाकिस्तान संबाेधल्याने धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. यावर मंत्री पाटील म्हणाले की, आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा मिनी पाकिस्तान केलेल्या वक्तव्याशी पक्षाचा काही एक संबंध नाही. मात्र, राणे यांनी असे बोलू नये, असा सल्ला पक्षाकडून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.