मालेगाव - टेहरे वाहतूक बंद

By admin | Published: September 19, 2015 11:57 PM2015-09-19T23:57:44+5:302015-09-19T23:59:14+5:30

गिरणा नदीला पूर : पुलाचा भराव गेला वाहून

Malegaon - Shutdown Traffic | मालेगाव - टेहरे वाहतूक बंद

मालेगाव - टेहरे वाहतूक बंद

Next

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत पडलेल्या पावसाने येथील गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पाण्याने टेहरे येथील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता कमी असताना रहदारीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या पाण्याने पुलाचा भराव वाहून गेला असल्याचे कारण सांगितले जात आहे.
तालुक्यासह कळवण, बागलाण, देवळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. परिसरातील हरणबारी व चणकापूर धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गिरणा नदीत ठेंगोडा बंधाऱ्यावरून १४ हजार ४४० क्यूसेक्स तर चणकापूर धरणातून तीन हजार ५२४ क्यूसेक्स पाणी असे एकूण सध्या १८ हजार ६६४ क्यूसेक्स पाणी वाहत आहे. हे पाणी काल रात्री शहरातजवळ पोहोचले आहे. या पुरामुळे येथील सोयगाव ते टेहरे यांना जोडणाऱ्या पुलाचा सोयगाव बाजूकडील मातीचा भराव वाहून गेला आहे. हा भराव वाहून गेल्याने येथे मोठे खड्डे पडल्याने पुलाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचा वेग पाहून व पुलाच्या भरावाची स्थिती पाहून हा पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येथील छावणी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव चौफुलीजवळ संरक्षक जाळ्या लावून रहदारीसाठी बंद केला आहे, तर टेहरे बाजूकडे पुलावर काटेरी बाभूळ लावून बंद केला आहे. नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे सुमारे दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित होत आहे. हा पूल बांधल्यानंतर पहिल्यांदाच दुथडी भरून नदीला पूर आला असल्याचे बोलले जाते. गेल्या पावसाळ्यात गिरणेला पाणी आले असले तरी त्याचे प्रमाण कमी होते. त्यात पाण्याचा जोर कमी होता. यंदा मात्र पाण्याला जोर जास्त असल्याने हा भराव वाहून गेल्याचे बोलले जाते. यामुळे पुलावर खर्च करण्यात आलेले लाखो रुपये वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Malegaon - Shutdown Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.