मालेगाव स्थायी समिती सभापतिपदी बच्छाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:30 PM2018-08-13T22:30:06+5:302018-08-13T22:30:27+5:30
मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी पहिल्यांदाच शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांची निवड झाली आहे. त्यांनी महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांचा पराभव केला आहे, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसची रसद घेऊन एमआयएमच्या सादिया लईक हाजी यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या पुष्पा राजेश गंगावणे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सोमवारी महापालिकेत सकाळी स्थायी समिती सभापतिपदाची व दुपारी महिला बालकल्याण समिती सभापतिपदाची निवड झाली. प्रारंभी स्थायी समिती सभापतिपदाची निवड घेण्यात आली. सभापतिपदासाठी शिवसेनेचे जे.पी. बच्छाव व महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या अर्जांची पीठासीन अधिकारी तथा अपर विभागीय आयुक्त जोतिबा पाटील यांनी छाननी केली. दोघांचे अर्ज वैध ठरल्याने मतदान घेण्यात आले. शिवसेनेचे बच्छाव यांना नऊ मते मिळाली तर शेख शाहीद यांना केवळ पाच मते मिळाली. पाटील यांनी बच्छाव यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित केले.
या निवडीनंतर समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. शिवसेनेने पहिल्यांदाच स्थायी समिती सभापतिपद पटकावल्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपर्क कार्यालयात सभा घेण्यात आली.