मालेगावी कडक निर्बंधांना व्यावसायिकांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:24+5:302021-04-24T04:14:24+5:30
मालेगाव : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी शहरात मात्र त्याचा ...
मालेगाव : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी शहरात मात्र त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. काही भागात अर्धवट शटर उघडे ठेवून रात्रीदेखील व्यवहार सुरू आहेत, तर रस्त्यावर तुरळक स्वरूपात का असेना नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे.
नेहमी गजबजलेल्या मोसम पूल भागातही दुचाकीस्वार आणि पायी जाणारे नागरिक बिनदिक्कत दिसून आले. शहरात रोजच सुमारे दोनशेच्या आसपास बाधित रुग्ण आढळत असून, शहरात दोन हजार आणि तालुक्यातील हजार असे तीन हजारांवर बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. लोकांना उपचारासाठी बेड आणि ऑक्सिजन मिळत नसताना शहरातील नागरिकांना त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. मालेगावी मोकाट फिरणाऱ्या नागरिकांचीही अँटिजेन चाचणी करण्यात यावी. त्यात बाधित आढळणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे. बाधित असणारे सुपर स्प्रेडर्स मोकाट संचार करत असल्यानेच शहरात बाधितांची संख्या वाढत आहे. रमजान सणाकरिता कपडे आणि सुका मेवा खरेदीसाठी लोक बाहेर पडत आहेत. काही भागात रात्री उशिरापर्यंत दुकानांचे शटर अर्धवट उघडे ठेवत दैनंदिन व्यवहार सुरू आहेत.
इन्फो
व्यापाऱ्यांचे भुसे यांना साकडे
कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वच व्यापाऱ्यांना ठराविक वेळेत व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. पूर्व भागातील काही भागात व्यवहार सुरळीत सुरू असल्याची तक्रार आहे. एकतर सर्वांसाठी सारखेच नियम लावून कडक निर्बंध लावावेत. शहरात मोकाट फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.