लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव तहसीलदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:12 AM2017-09-23T01:12:08+5:302017-09-23T01:12:14+5:30
गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
मालेगाव : गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. तालुक्यातील वºहाणे येथील मनोज पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पवार यांचा वीटभट्टी व गौण खनिज विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी येथील महसूल विभागाकडे गौण खनिज वाहतुकीसाठी परवानगी मागितली होती. तसेच ११ जुलै रोजी येथील महसूल विभागाच्या पथकाने त्यांचे डंपर पकडले आणि २ लाख ४ हजार रुपयांचा दंड केला. हा दंड पवार यांनी भरला मात्र त्यांना केवळ १३ हजार रुपयांची दंड भरल्याची पावती देण्यात आली होती. यानंतर डंपर चालवायचे असेल तर ५० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तडजोडीअंती ४० हजार रुपये हप्ता ठरला. याबाबत पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने ११ जुलै रोजी पडताळणी केली . त्यानंतर चार ते पाच वेळेस सापळा रचला, मात्र तहसिलदार कोळी व लिपीक पाटील यांनी पैसे स्वीकारले नाहीत. लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी तहसीलदार कोळी यांना पथकाने कार्यालयातून ताब्यात घेतले. तसेच कार्यालयाची तपासणी केली. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सुरू असताना लिपीक पाटील हे पथकाला शरण आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक पवन देसले, हवालदार कैलास शिरसाठ, संतोष हिरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, कैलास जोरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार आदिंनी ही कारवाई केली.
मालेगाव महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार, प्रांताधिकारी संदीप पाटील, प्रांत व तहसीलचे प्रत्येकी दोन लिपिक, एक महिला तलाठी हे गेल्या काही वर्षांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले होते. आता तहसीलदार सुरेश कोळी व लिपिक गोकुळ पाटील-सुद्धा अडकले. त्यामुळे तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.