मालेगाव तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:18 AM2021-09-07T04:18:51+5:302021-09-07T04:18:51+5:30
शेतीमालाला कवडी मोल भाव, वाढती महागाई असूनही ऐन मोसमात पावसाने हजेरी लावल्याने शिवारात डौलदार व हिरवीगार बहरलेली पिके पाहून ...
शेतीमालाला कवडी मोल भाव, वाढती महागाई असूनही ऐन मोसमात पावसाने हजेरी लावल्याने शिवारात डौलदार व हिरवीगार बहरलेली पिके पाहून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. वाकेला सोमवारी सकाळी सर्व शेतकरी बांधव चावडीवर एकत्र जमून रिवाजाप्रमाणे मानाच्या शेतकऱ्याची निवड केली गेली. यावर्षीचा मानाची बैलजोडीचा मान प्रगतिशील शेतकरी केदा बच्छाव यांच्या बैलजोडीचा मिळाला. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना अंघोळ घालण्यात आली. आपला बैल सर्व बैलांमध्ये उठून दिसावा यासाठी शेतकरी बांधव आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा साजशृंगार खरेदी करताना दिसले. बैलांच्या शिंगाणा हिंगूळ व अंगाला मातीपासून बनविलेल्या रंगाची पाठीवर नक्षी काढण्यात आली. सजावटीसाठी आवश्यक साहित्य गजरे, गोंडा, श्याम्या, नाथा, गेजा, कासरा, बाशिंग,बेगड, रंग, घुंगरू माळ, रंगबेरंगी फुगे आदी सजावटीच्या साहित्याचा वापर करून बैलांना सजविण्यात आले होते. मानाचे बैल व इतर गावांतील सर्व बैल जोड्या गाववेशी पूर्वमुखी मारुती मंदिरासमोर आणून तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. यावेळी घरातील सुहासिनींनी बैलांचे विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा घास भरविला. यावेळी सजविलेल्या बैलांच्या अंगावर'' कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा, ''आम्हले मुस्क, तुम्हले मास्क'' कोरोना लसीकरण करून घ्या शक्तिमान, जय जवान, जय किसान, अशा ओळी लिहून जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात शेतकऱ्यांचा व बैलांचा जिव्हाळ्याचा सण पोळा साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.