मालेगाव तालुक्यात कडकडीत बंद
By admin | Published: June 6, 2017 02:00 AM2017-06-06T02:00:52+5:302017-06-06T02:01:01+5:30
मालेगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.
टेहरे, वडेल, डाबली, करंजगव्हाण येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. करंजगव्हाण येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकातम्क पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी खाकुर्डी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले.
मालेगाव तालुक्यात शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. तालुका शिवसेनाप्रमुख संजय दुसाने, शहरप्रमुख श्रीराम मिस्तरी, सुनील चांगरे, अनिल पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
मोसमपुलावरील लोढा मार्केटमध्ये सेनेतर्फे बंदचे आवाहन करीत असताना छावणीचे पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी दिनेश ठाकरे यांना ताब्यात घेतले. ठाकरे यांना पोलीस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवण्यात आले होते. शहरासह तालुक्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. पूर्व भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर पश्चिम भागात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रामा मिस्तरी, दत्ता चौधरी, भारत बेद, भीमा भडांगे, तानाजी देशमुख, यशपाल बागुल, शरद पाटील, गोविंद गवळी, राजू टिळेकर आदी उपस्थित होते.
वडेल येथे बंद
तालुक्यातील वडेल येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनावेळी समाधान अहिरे, विलास अहिरे, जगन अहिरे, कांतीलाल पवार, बबलु देवरे, दशरथ बच्छाव, संजय जाधव, माधव सोनवणी उपस्थित होते.
टेहरेत बंद
येथे शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेऊन भाजीपाला, दूध, शेतमाल गावाबाहेर जाऊ दिला नाही. दूध गावातील ग्रामस्थांमध्ये वाटून दिले. काही लोक दूधविक्रीला जात असताना त्यांना संपाबाबत माहिती देऊन विनंती करुन शांततेने घरी पाठविले. संप शांततेत यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्नशील असून, प्रशासनातर्फे कारण नसताना गावातील तरुणांच्या घरी रात्री- पहाटे पोलीस कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गावात अशांततेचे वातावरण आहे. वेळप्रसंगी खोटे गुन्हे दाखल केल्यास रास्ता रोको करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शांततेने आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी शांततेत आंदोलन करु द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाके परिसरात बंद
वाकेसह परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन करीत कडकडीत बंद पाळला. चावडीवर बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याचे ठरविण्यात आले. मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर गेल्या आठवड्यापासून शेतमालाचे कोणतेही व्यवहार होऊ शकले नाही. त्याचा फटका बाहेर गावाहून आलेल्या कांदा खरेदीदारांना बसला. त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली. बंदचा परिणाम मुंगसे, आघार, पाटणे, वाके, टाकळी, सोनजे, सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, माळीवाडे आदि गावांत दिसून आला. दाभाडी येथे कॅण्डल मार्चलोकमत न्यूज नेटवर्क
दाभाडी : येथे किसान क्र ांती प्रचारक समितीच्या वतीने सरकारचा निषेध करत शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी तसेच दाभाडी बंदची हाक देत कँन्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील नवीन प्लॉटपासून ते मुख्य बाजारपेठेमार्गे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांनी कॅण्डल मार्च काढला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा आदी घोषणा देत बंदचे आवाहन करण्यात आले. गावातील प्रवेशद्वाराजवळ मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चात डॉ. एस. के. पाटील, अमोल निकम, प्रमोद निकम, हरिदादा निकम, नीलकंठ निकम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय देवरे, अशोक निकम, सुभाष निकम, बापू निकम, अंबू निकम, शिवाजी निकम, अंताजी निकम, अरु ण अहिरे, संजय मन्साराम देवरे, सुधाकर निकम, विशाल गोसावी, विवेक साळुंके, काकाजी निकम, मंगेश निकम, प्रवीण निकम आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.