मालेगाव तालुका दुष्काळाच्या दुष्टचक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:55 PM2019-04-03T22:55:47+5:302019-04-03T22:57:13+5:30
मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
एप्रिल महिना अखेरपर्यंत जनावरांना चारा पुरेल अशी स्थिती आहे. रोजगार हमी योजनेत सुमारे २० हजार मजुरांची नोंदणी झाली असली तरी कामांची मागणी नसल्याने रोजगार हमी योजना तालुक्यात कागदावरच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना निवडणुकीचे वेध लागले आहेत, तर प्रशासन निवडणूक घाईत व्यस्त आहे. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.
यंदा खरीप पिकापाठोपाठ रब्बी पिकांनाही दुष्काळी स्थितीचा फटका बसला. माळमाथा व काटवन भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
चारा व पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. चारा व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकावे लागत आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यासाठी १०६ टँकरच्या फेऱ्या मंजूर आहेत. त्यापैकी १०० फेऱ्या मारून पाणीपुरवठा केला जात आहे. येथील पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात सुमारे २० हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र विहीर खोदकाम वगळता इतर कामांची मागणी न झाल्यामुळे नोंदणीकृत मजुरांनाच काम उपलब्ध करून देण्यास येथील पंचायत समिती प्रशासनात उदासीनता दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हातांना काम नाही अशी परिस्थिती असताना गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक दुष्काळी उपाययोजना चालविण्यास असमर्थ ठरत आहेत. तालुक्यात २८ हजार ८५२ लहान जनावरे, तर एक लाख २१ हजार ४६८ मोठे जनावरे आहेत. असे एकूण एक लाख ४९ हजार ९२० लहान-मोठे जनावरे आहेत. या जनावरांना लागणाºया चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पशुधन विभागाने राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १४ हजार ७७६ किलो ज्वारीचे बियाणे व ४ हजार १२० किलो मका बियाणे असे एकूण १८ हजार ८९६ किलो चारा बियाणे वाटप केले आहे. तसेच गाळ पेराअंतर्गत ९४ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहेत. या बियाणे वाटपातून ३९ हजार मेट्रिक टन चारा तालुक्याला उपलब्ध होणार असून, सदरचा चारा एप्रिल महिन्यापर्यंत पुरणार असल्याचा दावा पशुधन विभागाकडून करण्यात आला आहे.
तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. बोरे अंबेदरी व साकूर लघुप्रकल्पात मृत साठा शिल्लक आहे, तर लुल्ले, दहिकुटे, झाडी, अजंग, दुंधे आदी लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दिवसागणिक दुष्काळाची भयानकता तालुक्यात वाढत चालली आहे. उन्हाचा प्रकोपही वाढला आहे. दुष्काळ व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त होते, तर आता प्रचार करण्यात दंग झाले आहेत. पाणीटंचाई व दुष्काळी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- चंद्रसिंग राजपूत, तहसीलदार, मालेगाव