मालेगावचे तापमान ४२.८ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:43 AM2019-03-30T01:43:51+5:302019-03-30T01:44:08+5:30
मालेगाव : शहर व परिसरात उन्हाची दाहकता वाढली आहे. शुक्रवारी मालेगावचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी नोंदविले गेले ...
मालेगाव : शहर व परिसरात उन्हाची दाहकता वाढली आहे. शुक्रवारी मालेगावचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी नोंदविले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या प्रकोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. सूर्य आग ओकीत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोज तापमानाचा पारा वर जात आहे. शुक्रवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारातील वर्दळ मंदावली होती. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवू लागले होते. सकाळच्या सत्रात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले होते.
सायंकाळपर्यंत वातावरणात उष्मा जाणवत होता. या कडाक्याच्या उन्हाचा आबालवृद्धांना त्रास होत आहे. उन्हाच्या तीव्रतेत एप्रिल-मे महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.