मालेगावी तापमानाचा वाढला पारा, रुग्णांना घामाच्या धारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:03+5:302021-04-29T04:11:03+5:30
शहरातील महानगर पालिका हद्दीतील १ हजार ७२६ आणि तालुक्यातील ८२१ असे एकूण २ हजार ५४७ कोरोनाबाधित रुग्ण शहर आणि ...
शहरातील महानगर पालिका हद्दीतील १ हजार ७२६ आणि तालुक्यातील ८२१ असे एकूण २ हजार ५४७ कोरोनाबाधित रुग्ण शहर आणि तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मालेगाव तालुक्यात झोडगे आणि दाभाडी येथे कोविड केअर सेंटर असून, गंभीर रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव शहरातही बाधितांवर मनपाच्या सहारा हॉस्पिटल आणि विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, सध्या मालेगावचा पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, असह्य उकाड्याने नागरिक हैराण होत आहे. त्यात दाभाडीसह झोडगे येथील कोविड सेंटर, तसेच शासकीय सहारा हॉस्पिटल येथे कूलर, एसीची सुविधा नसल्याने रुग्णांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रचंड उष्म्यानेच बाधित रुग्ण हैराण होत असून, घामाघूम होत आहेत. या ठिकाणी कूलर, एसीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.
इन्फो
एप्रिल तापला
१) दरवर्षी मालेगाव तालुक्यात सर्वाधिक तापमान असते. सध्या नागरिकांना कोरोनावर उपचारासाठी लढतानाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
२) मालेगावचे तापमान मंगळवारी (दि.२७) कमाल ४२.२ आणि किमान २४.४ अंश इतके होते, तर २६ रोजी ४२.८ इतके तापमान होते. ४३ ते ४४ अंशपर्यंत तापमान गेल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे.
३) शासकीय सहारा हॉस्पिटल आणि दाभाडी व झोडगे येथील कोविड केअर सेंटर्स वर कूलर किंवा एसी नसल्याने, कोरोनाबाधित रुग्णांना आजार आणि उन्हाचा उकाडा अशा दुहेरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.