मालेगावी : कॅम्प परिसरातील ४० वर्षे जुने शौचालय स्लॅब कोसळून दोन महिला जखमी
By admin | Published: June 12, 2015 11:31 PM2015-06-12T23:31:27+5:302015-06-12T23:34:26+5:30
मालेगावी : कॅम्प परिसरातील ४० वर्षे जुने शौचालय स्लॅब कोसळून दोन महिला जखमी
मालेगाव : येथील कॅम्प श्रीकृष्णनगरमध्ये गुरुवारी सकाळी निकृष्ट कामामुळे सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब कोसळून दोन महिला शौचालयाच्या टाकीत पडल्या. त्यापैकी गर्भवती महिला गंभीर जखमी झाली.
कॅम्प श्रीकृष्णनगरमध्ये शौचालय किमान ३५ ते ४० वर्षे जुने आहे. मुळात जुन्या व तकलादू असलेल्या या शौचालयांची मोठी दुरवस्था झाली आहे. सकाळी व संध्याकाळी येथे नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. २००८ मध्ये या शौचालयाच्या नूतनीकरणासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत अकरा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. ते या कामावर खर्च करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात देखील आले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त सुधीर राऊत यांनी दाखल तक्रारीवरून संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांनी केलेला खुलासा अमान्य करत त्याविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र त्यानंतर खुद्द आयुक्त राऊत यांचीच येथून बदली झाली. त्यामुळे सदर शौचालयांचे खरंच अकरा लक्ष रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले का, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. तसेच संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मनपा प्रशासनाने काय कारवाई केली हेदेखील आतापर्यंत गुलदस्त्यातच राहिले आहे.
येथील वाढत्या लोकसंख्येला श्रीकृष्णनगरचे शौचालय अपुरे पडत असल्यामुळे नागरिकांनी अधिक सीटचे शौचालय व इतरत्रही शौचालय निर्मितीची मागणी केली आहे. मनपाकडून याप्रश्नी कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत. मात्र गेल्या तीन वर्षात प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. मनपाने येथील मोडकळीस आलेल्या शौचालयांची केवळ कामापुरती डागडुजी केली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मात्र त्यामुळे हे शौचालय अधिकच मोडकळीस आली आहेत. त्याचाच दुष्परिणाम म्हणून गुरुवारी सकाळी या ठिकाणी महिला शौचालयात असताना अचानक स्लॅब कोसळल्याने दोन महिला शौचालयाच्या टाकीत पडल्या.
त्यापैकी एका महिला दरवाजा घट्ट पकडून टाकीबाहेर पडण्यात यशस्वी झाली. मात्र दुसरी महिला ही गर्भवती असल्यामुळे तिला मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या. इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर या महिलेस शौचालयाबाहेर काढण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)