मालेगाव : सत्तेचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहणार का?
By admin | Published: November 1, 2014 10:04 PM2014-11-01T22:04:41+5:302014-11-01T22:05:03+5:30
मालेगावकरांना यंदा मंत्रिपदाची आशा
संगमेश्वर : सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ यंदा तरी संपणार का? याकडे मालेगाव बाह्यमधील समस्त कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पूर्वाश्रमीचा दाभाडी मतदारसंघाचे आता मालेगाव बाह्यमध्ये रूपांतर झाले आहे. पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाने कायम सत्तेच्या बाजूने कौल दिल्याने त्याचे फळ म्हणून नेहमी मंत्रिपदे या मतदारसंघाला मिळाली आहेत. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी या मतदारसंघातून वेळोवेळी विजय मिळवत राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. सत्ताधारी पक्षाची पाठराखण झाल्यामुळे विकासकामांना गती मिळते. नवनवीन प्रकल्प मंजूर करून घेणे सोपे जाते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र २००४ व २००९ च्या निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघाने शिवसेनेला विजयी केले. राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता तर मालेगाव बाह्यमध्ये त्यांचा विरोधक असलेल्या शिवसेनेला प्रतिनिधीत्व असे चित्र होते. विरोधी पक्षाचा आमदार झाल्याने दहा वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची परंपरा खंडित झाली.
यंदा २०१४च्या निवडणुकीत दादा भुसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. यावेळी कॉँग्रेस आघाडीला पराभवास जावे लागल्याने राज्यात भाजपा मित्रपक्षांचे सरकार आले आहे. यावेळी तरी भाजपा शिवसेना यांचे सरकार येऊन सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ संपेल व मालेगाव बाह्यचे आमदार भुसे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल. त्यायोगे या भागाच्या विकासाला अधिक गती मिळू शकेल, शेती, पाणी, बेरोजगारी, शिक्षण आदि प्रश्न जलद गतीने सोडविण्यास मदत होईल. या भागाला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळून दहा वर्षाची प्रतीक्षा यंदा संपेल असा आशावाद कार्यकर्ते व मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर भाजपा सेनेतील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे ही आशा कितपत खरी होते याविषयी संंभ्रमाचे वातावरण आहे.