एक अपवादवगळता मालेगावकर उपेक्षितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:00 AM2019-03-27T01:00:48+5:302019-03-27T01:01:49+5:30
आजवर झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांपैकी फक्त एक अपवादवगळता मालेगाव शहर व तालुक्याच्या एकाही उमेदवाराला लोकसभा निवडणूक जिंकता आलेली नाही.
संगमेश्वर : आजवर झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांपैकी फक्त एक अपवादवगळता मालेगाव शहर व तालुक्याच्या एकाही उमेदवाराला लोकसभा निवडणूक जिंकता आलेली नाही. मतदारसंघ असूनही मालेगावकर याबाबत उपेक्षितच राहिले आहेत. १९५७ पासून मालेगाव हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. यावेळी प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार यादवराव नारायण जाधव यांनी भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय बीडकर यांचा ४१ हजार मतांनी पराभव करून लोकसभेत प्रवेश केला.
१९६७ पासून मालेगाव लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. मालेगाव तालुक्यातील काही उमेदवारांनी वेळोवेळी निवडणुका लढविल्या; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. २००९ पासून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे मतदारसंघ धुळे मतदारसंघाला जोडले गेले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र व बिगरराखीव मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला.
२००९च्या निवडणुकीत मालेगाव शहरासह ज्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व केले, त्या माजी मंत्री निहाल अहमद यांनी लोकसभेची निवडणूक लढविली; मात्र
त्यांच्याही पदरात यश पडले नाही. आपतर्फे माजी आमदार हारुण अन्सारी यांचे पुत्र व जेएटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निहाल अन्सारी यांनीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यांनाही पराभव चाखावा लागला होता.
या. ना. जाधव यांची कर्मभूमी मालेगाव होती. त्यानंतर १९६२ मध्ये मात्र त्यांचा माधवराव जाधव (भा. रा. काँग्रेस) यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. मालेगाव भागासह संपूर्ण जिल्ह्यात या. ना. जाधव यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. समाजवादी चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते.