मालेगावचा ओम ठरला यंदाचा ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’
By Admin | Published: December 16, 2015 11:11 PM2015-12-16T23:11:59+5:302015-12-16T23:43:21+5:30
मालेगावचा ओम ठरला यंदाचा ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’
मालेगाव : येथील रावळगाव नाका भागात राहणारा ओम कचेश्वर बोंगाणे हा यंदाच्या ‘क्लासिकल व्हॉइस आॅफ इंडिया’चा मानकरी ठरला आहे. लखनौ येथे शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही स्पर्धा संगीत मीलन संस्था व संगीत रिसर्च अकॅडमीतर्फे दरवर्षी घेतली जाते. त्यासाठी प्रथम राज्यपातळीवर स्पर्धा घेण्यात येऊन त्यातील विजेत्यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येते. यंदा १६ ठिकाणी राज्यपातळीवरील स्पर्धा झाली. शास्त्रीय संगीतावर आधारित या स्पर्धेत मुंबईत राज्यपातळीवर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात राज्यातून चाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात ओम पहिला आल्याने त्याची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तेव्हा त्याला व्हॉइस आॅफ मुंबई हा पुरस्कार देण्यात आला. ही स्पर्धा लखनौ येथे झाली. यासाठी १२ राज्यातून ६४ स्पर्धक निवडण्यात आले होते. तीन दिवसांच्या या स्पर्धेत ओमने वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी लखनौ येथील संगीत नाटक अकाडमीच्या संत गाडगे महाराज सभागृहात झाले. यावेळी खासदार डिंपल यादव, लखनौ स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक गौतम सेनगुप्ता, किशोर बाबू, सुरेंद्र जैयस्वाल आदि प्रमुख पाहुणे होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या ओमने मागील वर्षीही या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने त्याचे व्हॉइस आॅफ इंडियाचा मानकरी होण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र त्याने यंदा पुन्हा जोरदार तयारीने या स्पर्धेत भाग घेत या पुरस्कारावर नाव कोरले.