मालेगावी दुसऱ्या दिवशीही बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:36 PM2020-03-23T17:36:43+5:302020-03-23T17:37:24+5:30
मालेगाव : काल कोरोना विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर आज सोमवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली तर पुन्हा ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन होण्याच्या भीतीने शहरवासियांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली.
कॅम्पातील सोमवार बाजारात पेट्रोलपंपावर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी शहरवासियांनी रांग लावली होती. सोमवार बाजारसह बाजार समितीतील दुकाने आजही बंद होती. मोसमपुल ते कॅम्प रस्त्यावर तुरळक वर्दळ सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपुल भागात पोलीसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्ते अडविल्याने दुचाकीस्वारांना माघारी जावे लागले. जुना बसस्थानक परिसरात बाहेरगावाहून कोणतीही वाहने न आल्याने शुकशुकाट होता. पूर्व भाागतील भंगार बाजार, किदवाई रोड, पेरी चौक या भागातील दुकाने मात्र नियमितपणे सुरू असल्याचे आढळून आले. महापालिकेतर्फे संगमेश्वरसह ठिकठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आली.
शहरातील नागरिक आज तोंडाला मास्क आणि रुमाल लावूनच बाहेर पडताना दिसले. त्यामुळे उशिरा का होईना कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक खबरदारीचे उपाय योजत असल्याचे दिसून आले. शहरवासियाकडून औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर मास्क खरेदीसाठी होणारी गर्दी पाहून काही मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांकडून त्याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा अशा चढ्या दराने मास्क आणि हॅण्डग्लोजची विक्री होत असल्याचे दिसून आले. दरम्यान प्रवाशांंची वर्दळ असणा-या शहरात प्रथमच अघोषित संचारबंदीचे वातावरण असल्याने आणि बसेसही बंद असल्याने तालुक्यासह बाहेरगावहून कुणी प्रवासी शहरात येऊ शकला नाही.परिणामी नागरिकांना दुचाकीचा वापर करावा लागला. पूर्व भागातील काही ठिाकणी मात्र रिक्षा सुरू असल्याचे दिसून आले. काल अपर पोलिस अधीक्षकांनी मौलानांची बैठक घेऊन मशिदींमधून नागरिकांची जनजागृती करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याचा काहीसा परिणाम आज दिसून आला.