कुपोषणाचे प्रमाण कमी, मात्र उपाययोजना कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:00 PM2020-07-18T19:00:55+5:302020-07-18T19:07:00+5:30
कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महिला व बालकल्याण समितीची मासिक सभा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सर्वप्रथम कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला त्यात पेठ, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी, येवला, चांदवड या प्रकल्पांमध्ये मे महिन्याच्या तुलनेत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात अजूनही कुपोषण दिसून येत आहे. त्यामुळे गृह ग्रामविकास प्रकल्पाद्वारे बालकांना त्यांच्याच घरी कडधान्यांपासून बनवलेल्या अमायलेज युक्त पिठांच्या विविध पाककृतीद्वारे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण मातांना देऊन आहारात वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर शासनाकडून आलेले एनर्जी फुडचे वाटप बालकांना त्यांच्या घरी देण्यात आले आहेत. त्याचेही सेवन बालके करतात किंवा नाही हे याची पाहणी अंगणवाडी सेविकांकडून गृहभेटी देऊन पाहत आहेत. या बालकांना किती आहार किती वेळा दिला जातो याची खात्री करण्याची सूचना सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी सर्व संबंधित प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व सर्व यंत्रणांनी घ्यावी. बालकांची, गरोदर, स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, बालकांचे वजन घेऊन नियमित लसीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले. कविता धाकराव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात टीटीची लस उपलब्ध नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता, त्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांनी गृहभेटी देताना कोरोना संसर्गाचा प्रसार होणार नाही याची दक्षता व काळजी घेऊनच गृहभेटी देण्यात याव्यात. गृहभेटी देताना सॅनिटायझर व मास्क याचा वापर प्रामुख्याने करण्यात येऊन सेविकांनी स्वत:ची बालकांची काळजी घ्यावी अशा सक्त सूचना सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या. सभेस समिती सदस्य कविता धाकराव, गीतांजली पवार गोळे, गणेश अहिरे, मीनाक्षी चौरे, सुनिता सानप, कमल आहेर तसेच प्रभारी महिला व बालकल्याण अधिकारी बी. के. गरजे आदी उपस्थित होते.