ममा, आता कोरोनाला संपवूनच घरी ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:29 PM2020-04-15T23:29:01+5:302020-04-15T23:30:45+5:30
आई सामान्य रुग्णालयात कोरोनारूपी राक्षसाशी लढाईला गेली आहे. ‘ममा तू आता कोरोनाला संपवूनच घरी ये’, असे आर्जव चिमुरडी मुलगी जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी निघालेल्या डॉक्टर आईला करते तेव्हा आपल्या मुलीला निरोप देताना त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू तरळतात. सध्या कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत ते डॉक्टर्स आणि परिचारिका. मालेगाव शहरात रोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने त्यांचा रोजचा दिवस युद्धाचाच बनला आहे.
शफीक शेख ।
मालेगाव : आई सामान्य रुग्णालयात कोरोनारूपी राक्षसाशी लढाईला गेली आहे. ‘ममा तू आता कोरोनाला संपवूनच घरी ये’, असे आर्जव चिमुरडी मुलगी जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी निघालेल्या डॉक्टर आईला करते तेव्हा आपल्या मुलीला निरोप देताना त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू तरळतात. सध्या कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत ते डॉक्टर्स आणि परिचारिका. मालेगाव शहरात रोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने त्यांचा रोजचा दिवस युद्धाचाच बनला आहे.
एक महिला डॉक्टर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या घशातील स्राव घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना घरीही जात येत नाही. फोनवरच व्हिडीओ कॉलिंगद्वारे आपल्या लहानग्या मुलीशी बोलावं लागतं. त्यांच्या रोजच्या या दिनक्रमाबाबत त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला तेव्हा त्यांनी काहीसा ताण बाजूला ठेवत मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या आणि एकूणच परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करतानाच सारे काही ठीक होईल, असा आशावादही जागविला. डॉक्टर म्हणाल्या, ३५ कोरोनाबाधित रुग्णांमुळे मालेगाव रेड झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी यांना चोवीस तास हॉस्पिटलमध्ये राहावे लागत
आहे. अशावेळी कुटुंबाचा आधार आणि मित्रमैत्रिणींचे फोन बळ देऊन जातात. मी माझ्या मुलीशी फोनवर बोलते तेव्हा ती रडत असते. तेव्हा आपणही माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत, घर कुटुंब आहे याची जाणीव होते. आपल्यामुळे संक्रमण होऊ नये, अशी भीती वाटते. आमचे ही घशातील स्रावाचे नमुने पाठवले आहेत. ते निगेटिव्ह आले तरच आम्हाला घरी जाता येईल, असेही या डॉक्टर सांगतात.
...तर आणखी डॉक्टर्स लागतील
रुग्णांच्या विशेष म्हणजे लहान मुलांच्या घशातील स्त्राव घेताना आमची लहान मुले डोळ्यासमोर येतात. कोरोना रुग्ण तर अतिशय घाबरलेले असतात; परंतु त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेलेही अतिशय घाबरलेले असतात. आमच्या लहान मुलांचे कसे होईल, अशी चिंता त्यांना सतावते. त्यावेळी आम्ही त्यांना धीर देतो. सध्या उपचार स्थानिक पातळीवरच सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढली तर आणखी डॉक्टर्स लागतील. खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहीत करण्यात आली आहेत. महापालिकेकडे रुग्ण हस्तांतरित केल्यावर सामान्य रुग्णालयाची रूटीन कामे सुरू होतील, असा विश्वासही त्या देतात.