मामको बॅँक निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण
By admin | Published: October 29, 2015 09:54 PM2015-10-29T21:54:38+5:302015-10-29T21:58:49+5:30
शनिवारी प्रचार तोफा थंडावणार : रविवारी मतदान, तर सोमवारी मतमोजणी
शफीक शेख ल्ल मालेगाव
मालेगाव मर्चण्टस् को-आॅप. बॅँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी येत्या ३१ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहेत. रविवारी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदानासाठी ५२ बूथ उभारण्यात येणार असून त्यात दोन फर्म प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एटीटी आणि जेएटी विद्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.
मामको बॅँकेचे एकूण २० हजार ५४२ मतदार असून एका मतदान केंद्रावर सुमारे ४०० मतदार मतदान करतील.
पोलीस बंदोबस्त :- मामको बॅँक निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात मतदान केंद्रासाठी ६ पोलीस अधिकारी, २० पोलीस कर्मचारी आणि १० महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
३५० कर्मचारी : मामको बॅँक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे एकूण ३५० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक बूथवर २६० कर्मचारी नियुक्त केले असून १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
मतमोजणी ऐश्वर्या मंगल कार्यालयात : मालेगाव मर्चंट्स बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी ऐश्वर्या मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू होईल. मतपेट्या ऐश्वर्या मंगल कार्यालयाच्या स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यात येणार असून त्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मतमोजणीचे शूटिंग : ऐश्वर्या मंगल कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीसाठी एक पोलीस अधिकारी, सहा महिला कर्मचारी, तीन महिला पोलीस अधिकारी नियुक्त असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. त्याचे रेकॉर्डिंग केले जाईल.
मतदानासाठी ओळखपत्र : मामकोसाठी मतदान करताना मतदाराला फोटो आयडी आणावे लागेल. मतदान प्रतिनिधी, उमेदवार, मतमोजणीला प्रतिनिधी यांचेसाठी ओळखपत्र आवश्यक असेल त्याशिवाय कुणालाही प्रवेश करता येणार नाही.
या प्रक्रियेदरम्यान सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म. रा. पुणे यांनी नियुक्त केलेले मतदानासाठीचे १७ प्रकारचे पुरावे, ज्यात भारतीय राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्तरावर संस्था यांनी सदस्यांना दिलेले ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बॅँक, पोस्ट यात फोटो असणारे पासबुक, सक्षम प्राधिकरण, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जाती यांना फोटोसहीत दिलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणातर्फे दिलेल्या फोटोसह अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे, नोंदणी, फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्र परवाना, निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक, केंद्राच्या श्रम मंत्रालयाने दिलेला आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत ओळखपत्र, फोटोसहीत असलेली शिधापत्रिका, आधारकार्ड आदि पुराव्यांशिवाय कुणालाही मतदान करता येणार
नाही.
३१ ला प्रचार बंद : शनिवारी (दि. ३१) निवडणूक प्रचार थांबणार आहे. मतमोजणीसाठी २६ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी सांगितले.