ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 02:55 PM2019-04-07T14:55:47+5:302019-04-07T14:58:27+5:30
मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.
नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून उन्हाची तीव्रता अन् पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे येथील मुक्या जीवांची जीवाची काहिली होत आहे. वन्यजीवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउण्डेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.
कथीत वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींची संख्या कमी नाही. यामुळे जे खरेखुरे प्रामाणिकपणे ‘प्रेमी’चे कर्तव्य बजावतात, त्यांच्याकडेदेखील समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तसे होणे स्वभाविकही आहे. मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.
गुढीपाडव्याच्या दिवशी या स्वयंसेवकांनी ही आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. या भागात पाण्याच्या टॅँकरची आगाऊ नोंदणी करून घेत स्वयंसेवकांनी पाणवटे भरण्यास सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात दोन पाणवटे उभारलेल्या निधीतून भरणे शक्य झाल्याचे अभिजीत महाले यांनी सांगितले; मात्र समाजातील दानशुरांनाही सोशलमिडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. मे अखेरपर्यंत या भागातील पाणवटे संस्थेने दत्तक घेतले असून हा उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस महाले यांनी व्यक्त केला.