रयतेच्या राजाला मानवंदना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:47 PM2020-02-19T23:47:50+5:302020-02-20T00:10:56+5:30
जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकांमध्ये तरुण मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे अनेक ठिकाणी कानावर पडत होते. दुचाकींना भगवे झेंडे बांधून फिरणाऱ्या युवकांमुळे शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.
सिन्नर/मालेगाव : जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकांमध्ये तरुण मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे अनेक ठिकाणी कानावर पडत होते. दुचाकींना भगवे झेंडे बांधून फिरणाऱ्या युवकांमुळे शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.
शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. डोळ्याची पारणे फेडणाºया या मिरवणुकीत हजारो सिन्नरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. येथील आडवा फाटा भागात छत्रपती संभाजी महाराज चौकात बुधवारी सकाळी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह आडवा फाटा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शशिकांत गाडे, स्टाइसचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, प्रा. राजाराम मुंगसे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, कृष्णा कासार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटक सचिव रवींद्र काकड, वामन पवार, राजेंद्र रायजादे, सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, अशोक रूपवते, अनिल वराडे, पंकज जाधव, अनिल कर्पे, किरण गोजरे, सिल्व्हर लोटसचे संस्थापक दिलीप बिन्नर आदींसह तालुक्यातील विविध संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील तरुण, शहरातील पुुरुष, महिला भगिनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
डोळ्याचे पारणे फेडणारी सिन्नरची मिरवणूक
महाराष्ट्रातील जनतेचे आराध्यदैवत असणाºया छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आडवा फाटा येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील चित्ररथ, जिवंत देखावे तसेच मर्दानी आखाड्यातील मावळ्यांनी सादर केलेल्या शौर्याविष्काराने शहरवासीय अचंबित झाले. मिरवणुकीत विविध शाळांचा सहभाग शहरातील विविध शाळा-मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्यात शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा, पाळण्याचा प्रसंग, रायरेश्वराला अभिषेक, अश्वारूढ शिवाजी महाराज, दिमतीला भगव्या वेशातील शस्रधारी मावळे आणि मधूनच हर हर महादेवचा उठणारा गजर, हे जिवंत देखावे सिन्नरकरांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. स्रीचा आदर करण्यासाठी अनेक शाळांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक देखाव्यांनी समाजाला स्री सन्मानाची शिकवण दिली.
वातावण झाले भगवेमय
मिरवणुकीत ट्रॅक्टरवर शिवरायांचे पुतळे तसेच ऐतिहासिक जिवंत देखावे सादर करण्यात आले होते. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीयुद्ध, भालाफेक असे शौर्यकौशल्य सादर करण्यात येत होते. संबळ, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, झेंडा पथक, झांज पथक, वारकरी मिरवणुकीची शोभा वाढवत होते. शहर व परिसरातील अनेक शाळांतील विविध चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. लहान मुलांनी सादर केलेला शौर्याविष्कार डोळे दिपवणारा होता. मिरवणूक बघण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वांनी बांधलेल्या भगव्या फेट्यांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.