उमेदवाराविना मनोमीलनाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:46 AM2019-03-19T01:46:51+5:302019-03-19T01:47:09+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेषत: या मेळाव्यात अन्य पक्षातील काहींचे ‘इनकमिंग’ होण्याची चर्चा होती. त्यासंदर्भाने उत्तर महाराष्टÑातील मातब्बर राजकीय घराणे संपर्कात असल्याचे भाजपाकडून बोलले जात होते. कॉँग्रेस व राष्टÑवादीतून तिकीट न मिळालेल्यांची नावे त्यासाठी घेतली जात होती. पण तसेही काही न झाल्याने हा मेळावा उपचार ठरल्याची चर्चा खुद्द ‘युती’तच होऊ लागली आहे.
युतीच्या उमेदवारांचा एकप्रकारे प्रचाराचा नारळ एकत्र फोडण्याचा संदेश या मनोमीलन मेळाव्याद्वारे देण्यात आल्याने उत्तर महाराष्टÑातील झाडून सारे मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली. एवढेच नव्हे तर सेना वा भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून नुकतेच पक्षांतर केलेल्या व काही पक्षांतराच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांनीदेखील या मेळाव्यात आवर्जून हजेरी लावली. त्यांच्या हजेरीमुळे विद्यमान खासदारांना धडकी भरणे साहजिकच होते. विद्यमान खासदारांनी यापूर्वीच आपापल्यापरीने पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना त्यात अन्य इच्छुकांची भर पडल्यामुळे दोन्ही पक्षात राजी-नाराजीचे वातावरण असून, अशा परिस्थितीत युतीने मनोमीलनासाठी महामेळाव्याचे आयोजन केल्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती. तशी आशा बाळगूनच उत्तर महाराष्टÑाच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. परंतु ‘सेनेची जागा सेना लढवेल, भाजपाच्या जागेवर भाजपा’ एवढेच जाहीर करण्यात आल्यामुळे युतीच्या जागा वाटपात फेरबदल होणार नाही असे स्पष्ट झाले. शिवाय विरोधकांकडे उमेदवार नाहीत, अशी टीका एकीकडे करीत असताना मग स्वपक्षाकडे उमेदवारीसाठी जर इच्छुक मोठ्या प्रमाणात असतील तर युतीने मेळाव्यातच उमेदवार का जाहीर केले नाहीत, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
... तर मनातील जळमटे दूर झाली असती
या मेळाव्यात विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होण्याची व्यक्त होणारी शक्यताही फोल ठरली असून, जर दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर करून मनोमीलन मेळावा घेतला असता तर एकमेकांच्या मनातील जळमटे दूर झाली असती, असेही आता बोलले जात आहे.