‘मनाचे श्लोक’ बनले आयुष्याची ‘बोधवचने’ भावकाव्य : प्रपंच, परमार्थ, तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचे नित्य श्रवण-पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:49 AM2018-02-09T01:49:33+5:302018-02-09T01:50:08+5:30
नाशिक : ‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे’ असो की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असो, अगदी एका ओळीत संपूर्ण जीवनाचे सार मांडणारी या बोध वचनांची मोहिनी आबालवृद्धांना होताना दिसते.
नाशिक : ‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे’ असो की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असो, अगदी एका ओळीत संपूर्ण जीवनाचे सार मांडणारी या बोध वचनांची मोहिनी आबालवृद्धांना होताना दिसते. अगदी बालवर्गातील मुले समर्थ रामदासांची ही वचने मोठ्या आवडीने पाठांतर करत असतानाच ज्येष्ठ नागरिकदेखील आयुष्याच्या सायंकाळी मनाचे श्लोक वाचन करीत त्यात आपल्या आयुष्याचा आधार शोधतात तेव्हा या भावकाव्याची मराठी वाङ्मयातील मौलिकता आणि सर्वाेच्चता निदर्शनास येते. जीवनात प्रयत्नवाद म्हणजे कर्मवाद आणि सावधानतेची शिकवण देणारे मनाचे श्लोक सुमारे ४५० वर्षांपासून मराठी जनमानसाला उभारी देण्याचे कार्य करीत आहेत. समर्थ रामदासांचे संतत्व जसे अलौकिक आहे तसेच त्यांचे काव्यदेखील उच्चकोटीचे आहे. दासबोध, मनोबोध तथा मनाचे श्लोक, स्फुटकाव्य, अभंग, करुणाष्टके, रामायण, सोळा लघुकाव्य, एकवीस समासी (जुना दासबोध), आत्माराम अशी विपूल ग्रंथरचना समर्थ रामदासांनी केली, परंतु त्यांच्या एकूण प्रकाशित आणि अप्रकाशित वाङ््मयापैकी सर्वाधिक लोकप्रियता दासबोध आणि मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक या ग्रंथांना लाभली, असे मत संत साहित्याचे संशोधक व अभ्यासक प्रा. डॉ. रमेश आवरगावकर यांनी व्यक्त केले, तर श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्राचे अध्यक्ष व स्वामी समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक सुभाष खर्डेकर म्हणाले की, सदगुरू समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधामध्ये आद्य सनातन वैदिक हिंदू धर्म सांगितला असून, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे त्यातील तत्त्वज्ञान आहे, तर मनाचे श्लोकसारख्या बोधवचनाच्या वाचन-श्रवणाने आपल्याला जीवनातील नैराश्य दूर जाऊन एकप्रकारे नव्याने जगण्याची उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. साहजिकच आजच्या अत्याधुनिक युगातही रामदास स्वामींची ही बोधवचने म्हणजे मनाच्या श्लोकांचे पाठांतर श्रद्धेने, निष्ठेने, नित्य श्रवण पठण करणारी मंडळी आमच्या कष्टाच्या आणि दु:खाच्या क्षणी आम्हाला मनाचे श्लोकच तारतात, असे ज्येष्ठ नागरिक रामभाऊ पगार आणि काशीनाथ महाजन सांगतात, तेव्हा त्याची प्रचिती येते.