तणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक : गजानन केळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:27 AM2018-10-30T00:27:20+5:302018-10-30T00:27:53+5:30
ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते.
नाशिक : ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते. त्यामुळे ताणाव कमी करण्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनशक्तीचे संशोधन विभाग प्रमुख गजानन केळकर यांनी केले आहे. कुसुमाग्रज स्मारकात स्वामी विज्ञानानंद कृतज्ञता वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘मनशक्ती’ व्याख्यानमालेत ‘ताण व्यवस्थापन’ विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. तर अजित फापाळे यांनी सूत्रसंचालन केले.
गजानन केळकर म्हणाले, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मनात निर्माण होणाऱ्या अतिरेकी इच्छा लक्षात घेत त्याची मनाला जाणीव करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान साधना, सकारात्मक विचार व सोबत सत्कर्माची जोड देत इतरांसाठी केलेल्या कामातून ताणतणाव निश्चित कमी होऊ शकतो, असा विश्वासही व्यक्त करतानाच मनशक्तीच्या संशोधनातून हे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.