आझाद महामंडळाचा व्यवस्थापक जाळ्यात
By Admin | Published: November 27, 2015 10:59 PM2015-11-27T22:59:56+5:302015-11-27T23:00:53+5:30
शैक्षणिक कर्जासाठी अभिप्राय : १५ हजारांची मागणी
नाशिक : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे शैक्षणिक कर्जासाठी केलेल्या अर्जावर अभिप्राय व फाईल मंजुरीला पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून दहा हजार रुपये घेणारे सहायक जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार इंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़२७) सापळा लावून रंगेहाथ पकडले़ त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तक्रारदाराचा मुलगा अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे़ त्याच्या पुढील शिक्षणासाठी १ लाख ११ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी तक्रारदाराने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयाकडे आॅनलाइन अर्ज केला होता़ मात्र हे प्रकरण गत दोन महिन्यांपासून प्रलंबित होते़ या प्रकरणाची छाननी करून त्यावर अभिप्राय तसेच मुंबईला प्रमुख कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सहायक जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार वैकुंठराव इंगळे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ जिल्हा सहायक व्यवस्थापक इंगळे यांच्यासोबत झालेल्या तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी सापळा लावण्यात आला़ आझाद विकास महामंडळाच्या कार्यालयात दुपारी एक वाजेच्या सुमारास इंगळे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची रक्कम घेताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)