रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:18 AM2019-04-17T01:18:40+5:302019-04-17T01:18:58+5:30
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गोपालवाडीमार्गे जाणारा हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या रस्त्यावरून महेबूबनगर, सादिकनगर, गरीब नवाज कॉलनी या भागांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. चार महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था वाढीस लागली असून, नागरिकांना आपली ‘वाट’ बदलावी लागत आहे. भूमिगत गटारीचे काम पूर्णत्वास येऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; मात्र रस्त्याची अवस्था अद्यापही ‘जैसे-थे’ असल्याने संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण-डांबरीकरण करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे, अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. वारंवार महापालिका प्रशासनाच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील या रस्त्याची दुर्दशा थांबत नसून रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या रस्त्याची अवस्था बिघडविण्यास महापालिका प्रशासन कारणीभूत आहे, कारण रस्ता भूमिगत गटारीसाठी खोदला गेला त्यानंतर त्याची दुरवस्था अधिक वाढीस लागली. तत्पूर्वी रस्त्यावरून ये-जा करणे सहज शक्य होते. सध्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, सोमवारी सायंकाळी व रविवारी रात्री आलेल्या बेमोसमी पावसाने रस्त्याची दैनावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.