मनपाने महावितरणला बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:28 AM2018-06-19T00:28:11+5:302018-06-19T00:28:11+5:30
नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणच्या वतीने शहरातील विविध भागातील झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. विशेषत: ओव्हरहेड वायर असलेल्या ठिकाणी फांद्यांची छाटणी केली जाते. अन्यथा पावसाळ्यात झाड्याच्या फांद्या तारांवर पडून वीजतारा जोडल्या जातात आणि अपघात संभवतो. तसेच शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वतीने ही कामे केली जातात. परंतु अशी कामे करताना मात्र अनेकदा केवळ तारांवर येणाऱ्या फांद्या छाटल्यानंतर झाडांचा तोल जातो आणि ती पडण्यास येतात. शहरात अशी शेकडो झाडे धोकादायक असून, चालू महिन्याच्या प्रारंभी आलेल्या पहिल्याच पावसात सुमारे पन्नास ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या होत्या तशी अग्निशामक दलाकडे नोंददेखील आहे.
महावितरणकडून केवळ एकाच बाजूने वृक्षाचा घेर कमी करण्याचे प्रकार घडत असल्याने धोकादायक झालेल्या वृक्षांबाबत ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले होते. सदरचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने महावितरणने ज्या ज्या भागात वृक्षतोड केली अशा सर्व विभागीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने या नोटिसा बजावल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी दूरध्वनी करून चर्चा केल्याचे वृत्त आहे. वृक्षाचा घेर कमी करणे किंवा फांद्या छाटण्याबाबत प्रशासन यापूर्वी फारसे गांभीर्याने घेत नव्हते.