नाशिक शहरातील मंडळांचा गणेशोत्सव तयारी पुर्ण
By श्याम बागुल | Published: September 12, 2018 03:22 PM2018-09-12T15:22:29+5:302018-09-12T15:25:59+5:30
सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात आलेल्या
नाशिक : अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुरु असून, शहरातील जुन्या नाशकासह, बी. डी. भालेकर मैदान व नाशिक पश्चिम विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात आलेल्या अष्टविनायकाच्या सुबक कलाकृतीसह चांदीच्या गणपतीचे दर्शन नाशिककरांना घेता येणार आहे. अशोकस्तंभ गणेशोत्सव मित्र मंडळ दुर्गा देवीचा देखावा साकारणार असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर १०८ वर्षांची समृद्ध परंपरा असणाऱ्या दि नाशिक सराफ असोसिएशने यंदा पांडुरंगाचा देखावा साकारला असल्याचे अध्यक्ष महेश दिंडोरकर व प्रमोद कुलथे यांनी सांगितले आहे. अशोकस्तंभाजवळील ' मानाचा राजा ' मित्र मंडळाने सर्वात मोठी आणि २८ फुट उंच गणेशमूर्ती उभारली असून भव्यदिव्य राजवाड्याची प्रतिकृती साकारणार असल्याची माहिती अध्यक्ष सत्यम खंडाळे यांनी दिली. बी.डी. भालेकर मैदानात नरहरीचा राजा सामाजिक संस्था गड-किल्ले संवर्धन देखावा साकारणार असून रक्तदान व अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय बिरारी यांनी दिली आहे. राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने आदिमायेची साडेतीन शक्ती पिठांची प्रतिकृती साकारणार असल्याचे स्पष्ट केले असून १ हजार १ किलोचा तांब्याचा गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अवयव दान फॉर्म भरले जाणार असल्याचे अध्यक्ष सचिन रत्ने व गणेश बर्वे यांनी सांगितले आहे. महेंद्रा अँड महेंद्राने नागमणीचा देखावा साकारला असून बॉस , महेंद्रा सोना, एच.एल. आदींसह आठ मंडळांची बी. डी. भालेकर मैदानावर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कॉलेज रोडवर गोदा-श्रद्धा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सप्तशृंगी मातेची भव्य प्रतिकृती साकारणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश आण्णाजी पाटील व अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली आहे. जयबजरंग मंडळाच्या वतीने रामसेतू देखावा साकारण्यात येणार आहे. तर नरसिंह विद्यासागर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक देखावे साकारण्यात येणार असून स्पधार्ही आयोजित करण्यात येणार आहे.