मंडळांना परवानगीसाठी ‘एक खिडकी’
By admin | Published: September 11, 2015 11:01 PM2015-09-11T23:01:46+5:302015-09-11T23:02:48+5:30
महापौर : गणेशोत्सवासंदर्भात महापालिकेत बैठक
नाशिक : गणेश मंडळांनी अगोदर पोलिसांची परवानगी घेऊन यावी त्यानंतर महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील, असे स्पष्ट करतानाच मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे न पाडण्याचे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले.
येत्या १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडतानाच सूचनाही केल्या. रविवार कारंजा मित्रमंडळाचे पोपटराव नागपुरे यांनी रस्त्यांवर खड्डे पाडल्यास करण्यात येणाऱ्या दंडात्मक तरतुदीला आक्षेप घेतला. प्रायोजकांच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कर आकारण्यात येऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली. पेठरोडवरील श्रीमान सत्यवादी मंडळाचे लक्ष्मण धोत्रे यांनी सिंहस्थामुळे रस्त्यांवर टाकण्यात आलेले बॅरिकेडिंग पर्वणी संपल्यानंतर लगेच हटविण्याची सूचना केली. नाशिक जिल्हा गणेशोत्सव समितीचे सरचिटणीस हेमंत जगताप यांनी महापालिकेने परवानग्यांसाठी एक खिडकी पद्धत अवलंबावी, वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी मागणी केली. विडी कामगारनगर येथील गणेश आवनकर, पेठफाटा मित्र मंडळाचे नंदू पवार, आरटीओ कॉर्नर मंडळाचे रवि गायकवाड, रामानंद देशमुख, करणसिंग बावरी यांनीही मूर्ती संकलनासाठी विसर्जन कुंड चौकाचौकात उपलब्ध करून द्यावे, मंडपाजवळ निर्माल्य कलश ठेवावेत, स्वच्छता राखावी आदि मागण्या केल्या. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, गणेश मंडळांना आवश्यक त्या सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात येतील. मंडप उभारताना रस्त्यांत खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. त्यासाठी फोल्डिंगचे मंडप उभारावेत. दुष्काळाचे सावट आणि दहशतवादी कारवायांची भीती यामुळे मंडळांनी प्रबोधनही करावे. ज्या मंडळांनी यापूर्वी वीजजोडणीसाठी अनामत रक्कम भरली असेल, ती परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही महापौरांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिक्षण सभापती संजय चव्हाण, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे व अनिल चव्हाण, शहर अभियंता सुनील खुने, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, दत्तात्रेय गोतिसे, रोहिदास बहिरम आदि उपस्थित होते.