मंदार गाडगीळ यांची संगीत मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:17 AM2019-03-14T00:17:21+5:302019-03-14T00:17:37+5:30
देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले.
नाशिकरोड : देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले. जेलरोडच्या कोठारी कन्या शाळेत पुण्याचे नवोदित गायक मंदार गाडगीळ यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली.
नाशिकरोड परिसरात सुगम व शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा, यासाठी येथील पं. शंकरराव वैरागकर प्रतिष्ठानतर्फेमासिक संगीत सभा आयोजित केली जाते. यंदा गाडगीळ यांची मैफल रंगली. या कार्यक्र मात सुरुवातीला मंदार गाडगीळ यांनी राग मुलतानी विलंबित रागात सादर करून त्यात एक गोकुळ लकेवा ही बंदिश सादर केली. मंदार यांनी मध्यंतरानंतर राग भूपाली गात रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. गाडगीळ यांनी देवाघरचे ज्ञात कुणाला हे नाट्यगीत सादर केले.
पंडित शंकरराव वैरागकर यांनी रसिकांना मार्गदर्शन केले. अजित बने, प्रा. सुनील देवधर, नितीन काळे, श्रीकांत कुलकर्णी, सुनील गुरव, गोपाल सौंदाणे, सुरेखा शिंदे, सरला देशमुख आदी उपस्थित होते. ओंकार वैरागकर यांनी स्वागत तर सरिता वैरागकर यांनी प्रास्ताविक केले.
रसिकांची दाद
मंदार गाडगीळ यांच्या आलापातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सरगम अतिशय समर्पक पद्धतीने सादर करत समेवर येऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यानंतर मध्यलतीत एक तालामध्ये नैनन मे आणबाण ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यांना तबल्यावर कुमार संगीत कुलकर्णी आणि संवादिनीवर सागर कुलकर्णी यांनी साथसंगत केली.