बंधपत्रातील डॉक्टरांना मनपात सक्तीची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:08+5:302021-01-22T04:15:08+5:30
नाशिक : महापालिकेच्या बिटको आणि अन्य रुग्णालयात फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टर येण्यास तयार नसल्याने वैद्यकीय सेवेत अडचणी येत आहेत. ...
नाशिक : महापालिकेच्या बिटको आणि अन्य रुग्णालयात फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टर येण्यास तयार नसल्याने वैद्यकीय सेवेत अडचणी येत आहेत. त्यामुळे
कंत्राटी पद्धतीने डॉक्टर भरतीसाठी अटी ठरवताना त्यात पगार आणि कालावधीत
बदल करण्याचे आदेश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत. तर सध्या फिजिशियन
आणि एमबीबीएस डॉक्टरच महापालिकेच्या सेवेत येण्यास तयार नसल्याने
बंधपत्रातील डॉक्टरांना महापालिकेच्या रुग्णालयात सेवेची सक्ती करावी, असा
प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्थायी समितीची साप्ताहिक बैठक गुरुवारी (दि.२१) सभापती गणेश गिते
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बिटको रुग्णालयात एक्स-रे,
सोनोग्राफी, एमआरआय अशी साधने असतानादेखील त्यासाठी तंत्र कर्मचारी
उपस्थित नसल्याने सत्यभामा गाडेकर आणि राहुल दिवे यांनी प्रश्न उपस्थित
केले होते. महापालिकेकडे फिजिशियन, सर्जनदेखील नसल्याने रुग्णांना
जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात जावे लागते, अशा तक्रारी
त्यांनी केल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी
महापालिकेने एमबीबीएसच्या २३ डॉक्टरांच्या भरतीसाठी प्रक्रिया जाहीर
केली; परंतु केवळ सात अर्ज आले आणि त्यातही एक जण रुजू होण्यास तयार
झाला, तोही नंतर माघारी फिरल्याचे सांगितले. सोनोग्राफी, एमआरआयसाठी
तंत्रज्ञ मिळाले नाहीत आता पुन्हा भरतीसाठी जाहिरात देण्यात येणार आहे,
असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सेवेत कंत्राटी पद्धतीने डॉक्टर
घेण्यासाठी अटी, शर्तीत बदल करावे लागतील, असे डॉ. नागरगोजे यांनी
सांगितल्यानंतर आता तीन महिने करार पद्धतीने डॉक्टर भरण्याऐवजी अकरा
महिने कालावधीसाठी नेमावेत, असे सभापती गिते यांनी सांगितले. तर डॉक्टर
उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला पत्र पाठवून बंध पत्रानुसार सक्तीने
शासकीय सेवा कराव्या लागणाऱ्या डॉक्टरांना महापालिकेत नियुक्ती करावी अशी
विनंती करण्यात येणार असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. चर्चेत
कल्पना पांडे, प्रा. वर्षा भालेराव यांनी सहभाग घेतला.
इन्फो...
महापालिकेच्या वतीने आता अँटिजन टेस्ट बंद करण्यात आल्या आहेत.
आरटीपीसीआर करायची असल्यास थेट डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय किंवा समाज
कल्याण विभागाच्या ठिकाणी पाठवले जाते. तेथे डॉक्टरांनी सूचना केली असेल
तरच तपासणी केली जाते. त्यामुळे एखाद्या कुटुंबाला कोराेनाच्या संशयावरून
तपासणी करायची असेल तर खासगी लॅबमध्ये जाऊन प्रति व्यक्ती बाराशे ते
चौदाशे रुपये मोजावे लागतात, असे प्रा. वर्षा भालेराव यांनी सांगून
मनपाने अँटिजन चाचण्या सुरू कराव्या, अशी मागणी केली.
इन्फो...
शासनच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू हेाणार
आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ७७ इमारती कितपत स्वच्छ आहेेत, त्यात काय
दुरुस्ती बाकी आहे, हे तपासून कामे करण्याचे आदेश समितीने दिले. राहुल
दिवे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.