मनेगाव ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:48+5:302021-03-31T04:14:48+5:30
सिन्नर तालुक्यातील मोठी नळपाणी योजना असलेल्या मनेगावसह १६ गावे योजनेचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे ...
सिन्नर तालुक्यातील मोठी नळपाणी योजना असलेल्या मनेगावसह १६ गावे योजनेचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावे जागी झाली. मनेगाव ग्रामपंचायतीनेही १७ थकीत करदात्यांच्या नळांना सील केले त्यामुळे करभरणा करण्याला प्रतिसाद मिळाला. काहींनी दोन-चार दिवसांची मुदत मागितली. मात्र पाणीपुरवठा सुरळीत चालण्यासाठी योजनेतील समाविष्ट १६ गावांत ही मोहीम राबविली जात आहे.
ग्रामसेवक एम. बी. यादव, लिपिक भाऊसाहेब सोनवणे, कर्मचारी अरुण सोनवणे, बापू गायकवाड, संजय जाधव, संजय शिंदे, आदींनी करवसुलीसाठी प्रयत्न सुरू केले. बड्या थकबाकीदारांचे नळ सील करण्यात आले. काहींनी दोन ते चार दिवसांची मुदत मागितली. सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच सी. डी. भोजने यांनी स्वागत केले.
मनेगावसह १६ गावे योजनेचे ४५ लाख रुपये वीज देयक थकीत आहेत; त्यामुळे महावितरणने आठवड्यापूर्वी योजनेची वीज तोडली होती. समाविष्ट काही गावांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचा फटका इतरही गावांना सोसावा लागला. अखेर योजनेच्या समितीने गावनिहाय जबाबदारी दिल्याने मनेगाव येथे करवसुलीसाठी मोहीम राबविण्यात आली. नियमित कर भरणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कर थकीत असलेल्यांवर कारवाई सुरू केली आहे. गरज असल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. नळ सील करण्याची मोहीम हाती घेतल्याने कर थकीत असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.