मंगलम, तिल्लानाच्या सादरीकरणाने जिंकली मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:01 AM2019-08-17T01:01:11+5:302019-08-17T01:01:27+5:30
अप्रतिम पदन्यास आणि लयबद्ध हस्तमुद्रांसह केलेल्या नृत्यांगना रश्मी रुईकर यांनी केलेल्या ‘अरंगेत्रम’च्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कालिदास कलामंदिरात रश्मीने मंगलम आणि तिल्लानासह विविध प्रकार अत्यंत सफाईदारपणे सादर करीत रंगमंच प्रवेश केला.
नाशिक : अप्रतिम पदन्यास आणि लयबद्ध हस्तमुद्रांसह केलेल्या नृत्यांगना रश्मी रुईकर यांनी केलेल्या ‘अरंगेत्रम’च्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कालिदास कलामंदिरात रश्मीने मंगलम आणि तिल्लानासह विविध प्रकार अत्यंत सफाईदारपणे सादर करीत रंगमंच प्रवेश केला.
नृत्यसाधना कला अकादमीच्या वतीने आयोजित या कार्यक्र मात हिदोलाम रागावर आधारित तिल्लाना व सौराष्ट्रम रागावर आधारित मंगलम या प्रकाराचे सादरीकरण केले. त्याशिवाय मल्हारी, अलरिपू, श्री शंभो जातिस्वरम, पदम, वर्णम, अभंग यांचाही नृत्याविष्कार झाला. नृत्यात ताल, सुरावरील अप्रतिम पदलालित्यावर जाणकार रसिकांनी मनमुराद दाद दिली. अरंगेत्रम हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेशस्तवन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमासाठी के. दक्षिणामूर्ती पिलाई (मृदंगम), डॉ. सोमिया (गायन), नारायण पार्थसारथी (व्हायोलीन), नंदकुमार (बासरी), विकास बेलूकर (पखवाज) यांनी दमदार साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता पेठकर यांनी केले.
भरतनाट्यमचा वारसा
सात वर्षांच्या प्रशिक्षणानंतर एकटीने संपूर्ण कार्यक्र म करण्याच्या प्रक्रियेला अरंगेत्रम असे नाव आहे. भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्रीने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे. अरंगेत्रमनंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्र मांतून नृत्य करण्यास परवानगी देतात. त्यानुसार या कार्यक्रमातदेखील गुरु संगीता पेठकर यांच्या अनुमतीनंतरच रश्मीने गुरुवंदना करून तिचे सादरीकरण केले.