होता होता थांबली मंगलाष्टके....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:33+5:302021-07-14T04:18:33+5:30
नाशिकमध्ये हिंदू समाजातील एका दिव्यांग मुलीसोबत शिकणाऱ्या मुस्लीम युवकाने लग्नासाठी स्वखुशीने तयारी दर्शविली. या तरुण - तरुणीचे कुटुंबदेखील एकमेकांच्या ...
नाशिकमध्ये हिंदू समाजातील एका दिव्यांग मुलीसोबत शिकणाऱ्या मुस्लीम युवकाने लग्नासाठी स्वखुशीने तयारी दर्शविली. या तरुण - तरुणीचे कुटुंबदेखील एकमेकांच्या जुने परिचित आहेत. तरुणी दिव्यांग असल्याने तिला लग्नासाठी स्थळ येत नव्हती. तिच्यासोबत शिकणारा मुस्लीम युवक हे सर्व जाणून होता. त्याच्या संवेदनशील मनाने ही बाब हेरली आणि त्याने लग्नाचा मानस तरुणीच्या वडिलांकडे बोलून दाखविला. दोन्ही कुटुंबांतील वडीलधारी मंडळी एकत्र आली. त्यांची बैठक झाली आणि कोरोनाची साथ लक्षात घेता शासकीय नियमानुसार मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत शहरातील एका हॉटेलमध्ये लग्न सोहळा करण्याचे ठरले. जवळच्या पाहुण्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नपत्रिका पाठविण्यात आली. दरम्यान, ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे काही कट्टरवादी संघटनांनी त्यातून हस्तक्षेप सुरू केला. एका समाजाच्या काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला. त्यामुळे विवाह सोहळा स्थगित करण्यात आला. दरम्यान, वधू किंवा वर पक्षाकडून यासंदर्भात कोणाविरूध्दही पोलीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे अद्याप तरी तक्रार आलेली नाही.
इन्फो...
कोर्ट मॅरेज आटोपले
वधु-वरांच्या उभय पक्षांकडील नातेवाईकांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी ‘कोर्ट मॅरेज’ आटोपले. कोरोनाची साथ सुरू असल्याने वधू-वर विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी केली आणि वधू-वराच्या इच्छेप्रमाणे काेर्ट मॅरेज यापूर्वीच पार पडले असल्याचे वधू पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे दोघा कुटुंबीयांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.